घरमहाराष्ट्रनाशिकमहसूल दस्त आता एका क्लिकवर

महसूल दस्त आता एका क्लिकवर

Subscribe

जिल्ह्यातील १ कोटी दस्तांचे स्कॅनिंग पूर्ण

महसूल विभागाच्या राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील भूमी-अभिलेखाच्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे. ब्रिटीशकालीन दस्तांचा यात समावेश असून हे दस्त नवर्षापासून ई -रेकॉर्ड या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला राज्यात प्रायोगिक पातळीवर काही तालुक्यांना निवडण्यात आले होते. मात्र आता संपूर्ण राज्यात हे दस्त ऑनलाईन करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील १ कोटी ७६ लाख ५९ हजार ९२९ दस्तांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे.

महसूल अभिलेखातील काही रेकॉर्ड वारंवार हाताळल्याने जीर्ण झाले आहे. ते आणखी खराब होऊ नये यासाठी शासनाने सर्व दस्तऐवजांचे स्कॅनिग करून ते जतन करण्याचा निर्णय घेतला. हे काम करण्यासाठी राज्य सरकारनेच निविदा काढून नाशिक जिल्ह्यासाठी मे. कार्वी डेटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी निश्चित केली होती. मंत्रालयात लागलेल्या आगीत अनेक महत्त्वाच्या फायली जळून खाक झाल्यानंतर शासनाकडील दप्तराच्या सुरक्षिततेचा विषय सर्वत्र चर्चिला गेला; त्यातूनच हा प्रकल्प पुढे आला आहे.

- Advertisement -

हे दस्त होणार उपलब्ध
या संगणकीकरणात प्रत्येक सातबारा उतारा, तलाठ्यांकडील फेरफार नोंदवही, नमुना क, ड, ई पत्र, इनाम रजिस्टर, जन्म-मृत्यू नोंदणी, ८ अ खाते उतारा आदी महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे. प्रत्येक गावनिहाय संगणकात ही माहिती व मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून साठवून ठेवण्यात आली आहेत. त्यातही गटनिहाय, गावनिहाय, सातबारानिहाय अशा विविध सदरांखाली ही माहिती पाहता येणार आहे.

जिल्ह्यात १०० टक्के काम पूर्ण
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तहसिल कार्यालयातील १ कोटी ४९ लाख ५३ हजार ९५२ दस्त तर भूमी -अभिलेख व नगर भुमापन कार्यालयांकडील २७ लाख ५ हजार ९७७ दस्तांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात आले आहे. माहितीच्या या संगणकीकरणाने भविष्यात मिळकतधारकांनाही आपल्या मालमत्तेचे संपूर्ण विवरण व त्याची स्थिती एका क्लिकवर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे

- Advertisement -

असा होणार फायदा
जमीन वा फ्लॅटचा खरेदी व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल पाहणे आवश्यक ठरते. पूर्वी असे बदल पाहण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन शोध घ्यावा लागत होता. सामाईक कार्यक्षेत्रात एकापेक्षा अधिक कार्यालये असतात. त्यामुळे नागरिकांना अशा कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता या सुविधेमुळे शोधलेल्या दस्तांची अथवा दस्तांच्या सुचीची (इंडेक्स) प्रत डाउनलोडही करता येणार आहे. तसेच त्याची प्रमाणित प्रत हवी असल्यास अल्प शुल्क आकारून ती प्रमाणित करून देण्याची सुविधाही यामध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -