मुंबई : राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही. तथापि, सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील, अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी सोमवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. तसेच टीसीएस कंपनीच्या सर्व्हर डाउन घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.(Revenue Minister apologizes for Talathi exam mess Server down will be investigated)
महसूल विभागाकडून 4 हजार 644 तलाठी पदांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या ऑनलाइन परीक्षेचे काम टीसीएस कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. आजच्या तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाहिल्या सत्रात सकाळी 9 वाजता परीक्षा होऊ शकली नाही. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परीक्षा उशीरा सुरू होणेबाबत कळविण्यात आले. टीसीएस कंपनी आणि त्यांचे डेटा सेंटर यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा सकाळी 11 वाजता राज्यातील 30 जिल्हे आणि 115 टीसीएस केंद्रांवर सुरु करण्यात आल्याचे विखे- पाटील यांनी आज स्पष्ट केले.
हेही वाचा : ठाण्याच्या ग्रिहिथा विचारेने अवघ्या नवव्या वर्षी केला विक्रम, माउंट किलीमांजारोवर फडकवला तिरंगा
पुढील सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आदेश
राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना आणि त्याप्रमाणे सर्व परिक्षा केंद्रांवरील परिक्षार्थीना याची सूचना देण्यात आली होती, अशी माहिती विखे- पाटील यांनी दिली. तसेच पुढील सर्व परीक्षा वेळापत्रकानूसार सुरळीत पाडण्यासाठी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : मीरा-भाईंदर: गोचीडाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद
पैसे कुणाच्या खात्यात जात आहेत? विजय वडेट्टीवर
तलाठी परीक्षेच्या घोळावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तलाठी परीक्षेसाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क घेतले आहे. जर परीक्षा नीट होत नसेल तर हे पैसे कुणाच्या खात्यात जात आहेत? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारने तलाठी भारतीची परीक्षा चार केंद्रांवर ठेवली आहे. त्याऐवजी जिल्हानिहाय केंद्र ठेवायला हवे. गरीब शेतकऱ्यांची मुले पायपीट करून परीक्षेसाठी येतात आणि त्यांना ताटकळत राहावे लागत असेल तर ते योग्य नाही. सरकारने परीक्षा रद्द केली तर विद्यार्थ्यांकडून पुन्हा शुल्क घेऊन नये आणि विद्यार्थ्यांच्या जाण्यायेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.