काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता. त्यानंतर आता आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे बदल सन 2023करिता आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील. या बदलांच्या अनुषंगाने संबंधित परीक्षांची परीक्षा योजना, अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्यानुसार स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणार्या सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरिता यापुढे पारंपरिक, वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील पदभरतीकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार्या सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गाकरिता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरिता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गांकरिता पदभरतीकरिता अर्ज समजण्यात येईल व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता संबंधित संवर्गासाठी (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा इ.) निश्चित करण्यात येणार्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल. सर्व अराजपत्रित गट ब व गट क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार्या सर्व अराजपत्रित गट ब व गट क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरिता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरिता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरिता उमेदवाराने दिलेला विकल्प संबंधित संवर्गातील पदभरतीकरिता अर्ज समजण्यात येईल व त्याच्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून भरण्यात येणार्या विविध संवर्गांची कर्तव्ये व जबाबदार्या, वेतनश्रेणी, दर्जा इत्यादी बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा या नावाने स्वतंत्र परीक्षा आयोजित करण्यात येतील. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणार्या स्वतंत्र स्पर्धा परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी तसेच सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी अशा दोन पेपर्सच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गांकरिता उमेदवारांकडून मुख्य परीक्षेचा अर्ज घेतानाच अर्हतेवर आधारित पसंतीक्रम घेण्यात येईल.
मुख्य परीक्षेकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प घेण्यात येईल व त्याच्या आधारे संबंधित संवर्गाकरिता निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरिता शारीरिक चाचणी 70 गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही.
सुधारणेची आवश्यकता का?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गांकरिता राबवण्यात येणार्या सध्याच्या भरती प्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरती प्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करून आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे.