मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 19 एप्रिलला राज्यात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. परंतु, अद्यापही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. ज्यामुळे महायुतीतून कोणत्या जागेवरून कोणता उमेदवार निवडणूक लढणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दोन दिवसांपूर्वी एका पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत 4-5 जागांवर तिढा कायम असल्याचे सांगितले. याच जागांचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे, कल्याण, संभाजीनगर आणि पालघरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. हे मतदारसंघ महायुतीत कळीचा मुद्दा ठरले होते. त्यावर तोडगा काढण्यास आता महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना यश आल्याचे सांगितले जात आहे. (rift over seat allocation in the Mahayuti has been resolved)
हेही वाचा… Lok Sabha 2024 : गडचिरोलीत काँग्रेसचे उमेदवार किरसान यांचा विजय होणार – विजय वडेट्टीवार
महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर या जागांवर तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार अखेर कल्याण आणि ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के किंवा प्रताप सरनाईक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना जोरदार जोरदार लढत मिळणार आहे.
महायुतीत ठाणे, कल्याण, संभाजीनगर आणि पालघरच्या जागेमुळे मोठा तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या पहिल्या यादीत या चारही जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. भाजपाने या जागांवर दावा केल्याने मुख्यमंत्री शिंदे यांची डोकेदुखी वाढली होती. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या यादीत विद्यमान खासदार असलेल्या आपल्या मुलाचे नावही जाहीर करता आले नव्हते. ठाणे घ्या किंवा कल्याण द्या, अशी अटच भाजपाने शिंदे गटाला घातल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री पेचात पडले होते. ठाणे सोडले तर बालेकिल्ला जातोय आणि कल्याण सोडले तर पराभवाच्या भीतीने कल्याण सोडल्याची चर्चा होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर दोन्ही मतदारसंघ पदरात पाडून घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाला कल्याण आणि ठाणे दोन्ही मतदारसंघ मिळाले आहेत. त्यामुळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे. तर, छत्रपती संभाजीनगर ही जागा देखील शिंदे गटाच्या पदरात पडली असून या लोकसभेतून संदीपान भुमरे निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर, पालघरची जागा भाजपा लढणार आहे. गेल्या वेळी भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावरून निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी झाले होते. त्यामुळे ही जागा आमचीच आहे, असे सांगत भाजपाने त्यावर दावा केला होता. शिंदे गटानेही ही जागा आता भाजपला दिल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे आता महायुतीत खरंच या जागांचा तिढा सुटलेला आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच जर का महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असेल तर येत्या काही दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणाही महायुतीच्या नेत्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत महायुतीबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचेही बोलले जात आहे.