मुंबईत श्वसन विकारांमध्ये वाढ; लहान मुले, गर्भवतींसह ‘या’ रुग्णांना सर्वाधिक धोका

Air Pollution in Mumbai | मेट्रो तसेच नवीन इमारतीची कामे, वाहनातून निघणारा धूर तसेच औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमुळे होणारे वायू प्रदूषण व कचरा जाळल्यामुळे त्यातून उत्सर्जित होणारा कार्बन यामुळे वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून श्वसन विकारात सुद्धा वाढ झाली असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातून केले आहे. तसेच योग्य ते उपचार व काळजी न घेतल्यास श्वसन विकारांमुळे होणाऱ्या मृत्यूत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

breathing problem

Air Pollution in Mumbai | मुंबई – मुंबई व जवळच्या शहरांमध्ये म्हणजेच नवी मुंबई व ठाणे येथील वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) हवेची गुणवत्ता ढासळली आहे. सोमवारी मुंबईत २५६ AQI (Air Quality Index) दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या श्वसन विकारांत (Respiratory Disorders) वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुले आणि गर्भवती महिलांना आहे. त्यामुळे त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेची माहिती दिली आहे. दररोज वाहनांचा धूर, कारखाने या सर्वांमुळे हवेची गुणवत्ता जास्त खालावलेली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, चेंबुर आणि कुलाबा या शहरांची नावे आहेत. चेंबुरमध्ये देखील हवेची गुणवत्ता जास्त प्रमाणावर खालावली आहे. भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ होसाळीकर यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हवेच्या गुणवत्तेची माहिती दिली. त्यानुसार नवी मुंबईत ३३२ AQI ची नोंद करण्यात आली आहे. मेट्रो तसेच नवीन इमारतीची कामे, वाहनातून निघणारा धूर तसेच औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमुळे होणारे वायू प्रदूषण व कचरा जाळल्यामुळे त्यातून उत्सर्जित होणारा कार्बन यामुळे वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून श्वसन विकारात सुद्धा वाढ झाली असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातून केले आहे. तसेच योग्य ते उपचार व काळजी न घेतल्यास श्वसन विकारांमुळे होणाऱ्या मृत्यूत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. पार्थिव शहा म्हणाले, “राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. वृद्ध, लहान मुले तसेच गर्भवती महिलांना वायू प्रदूषणाचा जास्त परिणाम होतो. शिवाय, सह-व्याधी, हृदयरोग, कर्करोगाचे रुग्ण, कोविड रूग्ण आणि सीओपीडी रुग्णांना जास्त धोका असतो. गंभीर रुग्णांव्यतिरिक्त, निरोगी लोकांना डोळ्यांमध्ये खाज सुटणे, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं गरजेचे आहे. आजारी असलेल्या व्यक्तींनी वेळेवर जेवण करणे, औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे.”

मुंबई महानगर पालिकेच्या आकडेवारीनुसार तीव्र ब्रॉन्कायटिस, दमा व न्यूमोनिया गेल्या पाच वर्षांत १३ हजार ४४४ एकूण मृत्यूंची नोंद झाली आहे. दूषित हवेतील सल्फर डायऑक्साईडमुळे ज्वालामुखी, आम्लवर्षा, हृदरोग, श्वसनाचे विकार, कर्करोग, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी यासारखे आजार वाढण्याची शक्यता असून, नायट्रोजन डाय ऑक्साइडमुळे फुफ्फुसाचा दाह, जंतूसंसर्ग, कार्बन मोनॉक्साइडमुळे हृदयरोग, मेंदूला हानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तर या प्रदूषणामुळे ओझोनची पातळी वाढत असून, वाढणारा ओझोन शरीराला घातक ठरू शकतो अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.