Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका वाढला

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका वाढला

मुंबईत तिसरी लाट अगोदर आली - महापौर किशोरी पेडणेकर, नागपुरात दोन-तीन दिवसांत निर्बंध - नितीन राऊत, निर्बंध संपूर्ण राज्यात लावावे लागतील -विजय वडेट्टीवार,

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, तर ती अगोदरच आली आहे, असे विधान करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना इशारा दिला आहे. तर राज्याची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना दोन-तीन दिवसांत पुन्हा कठोर निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. त्यातच निर्बंध लादले तर ते केवळ एक शहर आणि जिल्ह्यापुरते मर्यादीत नसतील, संपूर्ण राज्यात निर्बंध लावण्यात येतील, असे सांगत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यामुळे दुकानदार, व्यापारी, उद्योजकांपासून सर्वसामान्यही काळजीत आहेत.

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकार सावध पावले उचलताना दिसत आहे. गर्दी होणार नाही यासाठी अजूनही अनेक निर्बंध लागू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना रुग्ण वाढले तर पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट आधीच आली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कडक निर्बंध लागू होतील,असे जाहीर केले. तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्बंध कठोर करण्याबाबतची नियमावली जाहीर होण्याआधीच नितीन राऊत यांनी सोमवारी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली. शहरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून दोन- तीन दिवसांनंतर पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा त्यांनी केली.

मात्र, विजय वडेट्टीवार यांनी राऊत यांचा दावा फेटाळताना सणासुदीच्या काळात नागरिकांनी सहकार्य केले नाही आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर एखादे शहर अथवा जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्यात निर्बंध लावावे लागतील, असे सांगितले.

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -