घरमहाराष्ट्रठाकरे गटाची मशाल धगधगली, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी

ठाकरे गटाची मशाल धगधगली, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी

Subscribe

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके 64 हजार 959 मताधिक्यांनी विजयी झाल्या. त्यांना एकूण 66 हजार 530 मते मिळाली. त्या पाठोपाठ ‘नोटा’ला 12 हजार 806 मते मिळाली. एकूण सहा अपक्ष उमेदवारांपैकी चौघांना चार आकडी संख्या ओलांडता आली.

- Advertisement -

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदांना बंड पुकारल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यातच ठाकरे आणि शिंदे गटांनी पक्ष आणि त्याच्या निवडणूक चिन्हावर दावा केला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे ठेवले आणि निवडणूक आयोगाने त्यांना ‘मशाल’ चिन्ह दिले. तर, एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे ठेवले आणि त्यांना ‘ढाल-तलवार’ चिन्ह मिळाले. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूकही लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व आले होते.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाऐवजी भाजपाने आपला उमेदवार मुरजी पटेल यांना उतरवले होते. पण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचे आवाहन केले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हेच आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत भाजपाने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी ही जागा सोडली होती. त्यामुळे ऋतुजा लटके विरुद्ध सहा अपक्ष उमेदवार अशी लढत झाली. 3 नोव्हेंबरला 31.74 टक्केच मतदान झाले.

- Advertisement -

मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीतच 4 हजार 277 मते ऋतुजा लटके यांना मिळाली. त्यांना पाचव्या फेरीनंतर एकूण 17 हजार 278, 10व्या फेरीनंतर 37 हजार 469 आणि 15व्या फेरीनंतर 55 हजार 946 मते त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय होणार हे निश्चित झाले होते. अखेर शेवटच्या 19व्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 66 हजार 530 मते मिळाली. तर, अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाठी यांना 1 हजार 571, नीना खेडेकर यांना 1 हजार 531, बाळा नाडर यांना 1 हजार 506 आणि फरहाना सय्यद यांना 1 हजार 93 मते मिळाली.

या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या पाठोपाठ ‘नोटा’ला (None of the above) मते मिळाली. पहिल्या फेरीत नोटाला 622, पाचव्या फेरीनंतर 3 हजार 859, 10व्या फेरीअखेर 7 हजार 556 आणि 15व्या फेरीअखेर 10 हजार 906 मते मिळाली.

रमेश लटके यांच्यापेक्षा जास्त मते
अंधेरी पूर्वचे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारेे रमेश लटके यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. रमेश लटके यांना 2014मध्ये 52 हजार 817 मते तर, 2019मध्ये 62 हजार 773 मते मिळाली होती. तर, ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मते मिळाली. एकूण 76.78 टक्के मते त्यांना मिळाली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -