मलिकांनी आरोप केलेला रियाज भाटी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, वाझेच्या वसुलीमध्येही रियाजचे नाव

Riyaz bhati is ncp member who accused nawab malik in fadnavis allegations
मलिकांनी आरोप केलेला रियाज भाटी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, वाझेच्या वसुलीमध्येही रियाजचे नाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी रियाज भाटी कोण आहे? असा सवाल उपस्थित करत त्याला बनावट पासपोर्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती असे सांगितले आहे. तर हा रियाज भाटी पकडला गेला तेव्हा काँग्रेसचा सचिव तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे. त्यामुळे नवाब मलिक आता स्वतःच्या पक्षालाच अडचणीत आणण्याचे काम करतायत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले या आरोपांना आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार म्हणाले की, सामान्य माणसांना फसवण्याचा धंदा आहे त्याचाच भाग म्हणून आरोप कर आणि पळून जा असा प्रकार मलिकांनी केला असल्याची खोचक टीका शेलार यांनी केली आहे. रियाज भाटीचा उल्लेख केला, पंतप्रधान कार्यक्रम आणि कार्यालयाशी भाटीचा काहीही संपर्क आणि संबंध नाही. फोटोवर संबंध प्रस्थापित करायचा असेल तर कोणाची नावे बदनाम करण्यासाठी फोटोचा धंदा करु नका, तुम्ही एक बोट दाखवाल ४ बोट तुमच्याकडे येतील असे सांगत रियाज भाटीचे शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेलारांनी दाखवले.

रियाज भाटी गायब की त्याला पळवलं?

रियाज भाटीला क्रिकेटमध्ये राजाश्रय कोणी दिलं हे जगजाहीर आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याचे नाव घेऊन खळबळ करणार नाही असा इशाराही शेलारांनी दिला आहे. रियाज भाटी गायब आहे की पळवलं आहे? रियाज भाटीला पळवण्याचे काम राष्ट्रवादीने केलं नाही ना? असा सवाल राष्ट्रवादीला केला आहे. सचिन वाझेच्या वसुलीमध्ये जी नाव समोर आली आहेत त्यामध्ये रियाजचे नाव आहे. रियाज कोठडीत आला तर सत्य बाहेर येईल अशी त्यांना भीती असेल असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांचा आरोप काय?

रियाज भाटी कोण आहे. २९ ऑक्टोबरला बनावट नोटसोबत पकडण्यात आले. दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याची माहिती पसरली. डबल पासपोर्टसोबत कोणाला पकडण्यात आले? रियाज भाटी तुमच्यासोबत डीनर टेबलवर कसा काय दिसत होता? पंतप्रधान मोदी मुंबईत आल्यावर रियाज भाटीने त्यांच्यासोबत फोटो काढला. तुम्ही मुख्यमंत्री असताना सर्व क्रिमिनल लोकांना तुम्ही सरकारमध्ये उच्च पदी बसवले तसेच तुम्ही कमिश्नर बसवुन तक्रार करुन वसुली केली. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. आता एवढेच सांगत आहे परंतु यापुढे अनेक प्रकरणे तुम्हाला सांगेल. रियाज तुमच्यासोबत पार्टीत कसा काय? २ दिवसांत कसा काय सुटला? बनावट नोटांची प्रकरणात चौकशी का करण्यात आली नाही असे प्रश्न मलिकांनी उपस्थित केले आहेत.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब