शस्त्रांचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; दोन लाखांची लूट, कर्मचार्‍यांना मारहाण

 

अहमदनगर : सोलापूर-अहमदनगर राज्यमार्गावरील दहिगाव साकत गावाजवळील केतन पेट्रोल पंपावर रविवारी (दि.१) पहाटे दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून दोन कर्मचार्‍यांना मारहाण करत सुमारे दोन लाखांची रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी जाताना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा गायब केले. याप्रकरणी अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरोडेखोराच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे पोलीस रवाना झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, अहमदनगर -सोलापूर महामार्गावरील दहिगाव साकत गावानजीक असलेल्या भारत पेट्रो लियम कंपनीच्या केतन पेट्रोल पंपावर रविवारी पहाटे दरोडेखोरांनी दरोडा टाकला. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दोन कर्मचारी व ग्राहकांना मारहाण केली. दरोडेखोरांनी ग्राहकांनंच्या वाहनांच्या चाव्या काढून घेतल्या. रोकड घेत दरोडेखोर फरार झाले. दरोड्याची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.तसेच श्वान पथक आणि फिंगरप्रिंट पथक घटनास्थळी दाखल झाले.