‘वामन हरी पेठे’मधून ५८ किलो सोनं लंपास; चोराचं नाव ऐकाल तर चकित व्हाल!

प्रसिद्ध अशा वामन हरी पेठे सुवर्णपेढीमधून तब्बल ५८ किलो सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे.

Waman Hari Pethe
वामन हरी पेठे

वामन हरी पेठे हे नाव ऐकलं की आपल्यासमोर ख्यातनाम सुप्रसिद्ध आशी सुवर्णपेढी येते. राज्यभरात त्यांच्या शाखांचं जाळं असून विश्वासार्ह सुवर्ण व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. याच ‘वामन हरी पेठें’च्या पेढीवर दरोडा पडला आहे. या दरोड्यामध्ये तब्बल ५८ किलो सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. वामन हरी पेठेंच्या औरंगाबाद शाखेमध्ये हा दरोडा पडला आहे. आजच्या बाजारमूल्यानुसार या सोन्याची किंमत १९ कोटी ७२ लाखांच्या घरात जाते. आणि घडवलेल्या दागिन्यांची किंमत २७ कोटींच्या आसपास आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याच पेढीत १५ वर्षांपासून काम करणाऱ्या जुन्या मॅनेजरनंच हा दरोडा टाकला आहे. दोन वर्षांच्या कालावधीमध्ये पद्धतशीरपणे हे ५८ किलो सोनं लांबवण्यात आलं आहे! दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेनं तातडीनं पावलं उचलत या मॅनेजरसोबत त्याच्या तीन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कसं लांबवलं ५८ किलो सोनं?

अंकुर अनंत राणे असे या आरोपी मॅनेजरचं नाव आहे. अंकुर राणे गेल्या १५ वर्षांपासून वामन हरी पेठेंच्या औरंगाबादच्या पेढीमध्ये काम करत होता. इतक्या वर्षांपासून तो काम करत असल्यामुळे मालक विश्वनाथ प्रकाश पेठे यांच्या विश्वासातला होता. त्यामुळे विश्वनाथ पेठे यांनी राणेवरच पेढीची जबाबदारी सोपवली होती. पण याच विश्वासाचा गैरफायदा राणेने घेतला. राजेंद्र किसनलाल जैन आणि लोकेश पवनकुमार जैन या दोघांना राणेनं गेल्या २ वर्षांमध्ये दुकानातले ५८ किलो वजनाचे दागिने दिले. पेढीतल्याच एका सामान्य नोकरामुळे हा प्रकार उघडकीस आला.


हेही वाचा – मुथूट फायनान्स दरोडा : सॅम्युअलची हत्या करणारा दुसरा दरोडेखोर गजाआड

…आणि चोरी पकडली गेली!

एप्रिल २०१९मध्ये दरवर्षीप्रमाणे पेढीतला स्टॉक तपासत असताना एका कर्मचाऱ्याला दागिने कमी असल्याचं लक्षात आलं. त्यानं ही बाब विश्वनाथ पेठे यांच्या निदर्शनास आणून दिली. पेठेंनी लागलीच औरंगाबाद पेढीत धाव घेऊन तपासणी केली असता २०१७ ते २०१९ या दोन वर्षांमध्ये हे दागिने पेढीतून गायब झाल्याचं लक्षात आलं. या प्रकाराबद्दल त्यांनी राणेला खोदून जाब विचारल्यानंतर मात्र त्यानं दागिने राजेंद्र जैन आणि लोकशे जैन या दोघांना दिल्याचं कबूल केलं. त्यानंतर पेठे यांच्याच तक्रारीवरून पोलिसांनी राणे आणि इतर दोघांना आटक केली.