Homeमहाराष्ट्रकोकणRaigad Dhatav MIDC Fire : धाटावमधील आगीनंतर अनेक कारखाने बंद

Raigad Dhatav MIDC Fire : धाटावमधील आगीनंतर अनेक कारखाने बंद

Subscribe

धाटाव एमआयडीसीतील सांडपणी प्रक्रिया केंद्राला आग लागून एमआयडीसीचे लाखोंचे नुकसान झाले आहे तर कारखान्यांचे कोट्यवधींची नुकसान झाले. या आगीमुळे अनेक कारखाने बंद पडले असून ते सोमवारपासून पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

रोहे : तालुक्यातील धाटाव औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग व सामाईक प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्या आर. अँड बी. एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे रविवारी ( २१ एप्रिल) सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये जलकुंभात पाणी सोडणाऱ्या वाहिन्यांजवळ आग लागली. यामुळे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद झाल्याने धाटावमधील कारखान्यांतील उत्पादन प्रक्रिया ठप्प होऊन सर्व कारखाने कालपासून बंद पडले आहेत.
धाटाव अग्निशमन जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मआयडीसीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तर अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे कालपासून कारखान्यांची उत्पादन प्रक्रिया बंद झाल्यामुळे त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाविषयी महत्त्वाच्या असणाऱ्या सामाईक प्रक्रिया केंद्राबाबत बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकारी आणि संबंधित एजन्सीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
धाटाव येथील सामाईक प्रक्रिया केंद्रात रविवारीच्या आग दुर्घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आगीनंतर एमआयडीसी आणि आर. अँड बी. एजन्सीची कुणीही जबाबदार व्यक्ती घटनास्थळी दाखल झाली नव्हती. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात कारखान्यांतील जमा झालेल्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुढे गोफणच्या खाडीत सोडले जाते. याचे दिवसभराचे नियोजन करण्यात आलेले असते. मात्र आग लागल्यामुळे हे नियोजन डळमळीत झाले. परिणामी कारखान्यांमधील रासायनिक पाणी केंद्रात घेण्याची प्रक्रिया संपूर्ण बंद पडली. परिणामी सर्व कारखान्यांची उत्पादन प्रक्रिया कालपासून बंद ठेवण्यात आली आहे.
रोहे इंडस्ट्रीयल असोसिएशने (RIA) दिलेल्या माहितीनुसार या आगीमुळे एमआयडीसीचे १८ ते २० लाखांचे नुकसान झाले आहे. एमआयडीसी उपविभागीय अभियंता शशिकांत गीते यांच्याशी संपर्क साधला असता, आता आमचे दुरुस्तीचे काम सुरू असून सोमवारी (२२ एप्रिल) सायंकाळी ६ वाजल्यापासून कारखाने पूर्ववत सुरु होतील, असे त्यांनी सांगितले. सांडपाणी प्रक्रिया केंद्र अखत्यारीत असलेले एमआयडीसी आणि ते चालवणारे आर. अँड बी. यांच्या हलगर्जीपणामुळेच ही आग लागली आहे. यातून सरकारचे नुकसान झाले आणि कामगार वेठीस धरले गेले. यामुळे या आगीच्या घटनेची कामगार सुरक्षा विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कामगार करत आहेत.