सध्याचे राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडले, रोहीत पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

rohit pawar

मुंबई – वेदान्त समूह आणि फॉक्सकॉनच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत राज्यात येणारी 1 लाख 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजराकडे गेली असल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. याला शिंदे सरकारकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी ट्वीटद्वारे शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. याबाबतचे ट्वीट त्यांनी केले आहे.

ट्वीटमध्ये काय –

ट्वीटमध्ये सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ७६ हजार कोटींच्या धोरणात केंद्र सरकारने अनेक बदल केले असून मर्यादित असलेल्या अनुदानाच्या रकमा वाढविण्याचा अत्यंत महत्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय घेतला आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

या सोबत त्यांनी प्रकल्प उभारणीसाठी आधी १२००० कोटीच्या सिलिंगसह ५० % अनुदान होते, पण आता सिलिंग काढण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारात असलेली ३०%, ४० % अनुदान मर्यादा आता सरसकट ५० % करण्यात आली. यामुळे वेदांत सारख्या लाखोंची रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मोठे बळ मिळेल, असे म्हटले आहे.

यावेळी त्यांनी एकीकडे सेमीकंडक्टर उद्योगाला चालना मिळत असल्याचा आनंद आहे. पण दुसरीकडं वेदांत महाराष्ट्रातून गेल्याचं दुःख आहे. महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या सवलती गुजरातपेक्षा ११ हजार कोटींनी जास्त होत्या तरीही वेदांत गुजरातला का गेला, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारच्या सुधारित सेमीकंडक्टर धोरणात मिळत आहे. मविआ सरकार सवलती देण्यात कमी पडले नाही तर सध्याचे राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडले, हे सत्य नाकारता येणार नाही, असे म्हटले आहे.