मुंबई : महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री आणि खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे, मात्र अद्याप भाजपाकडून या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असे जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीच्या मंत्र्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. (Rohit Pawar is worried about the ministers of the Mahayuti)
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी म्हटले की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील सर्वच घटक पक्षाच्या ज्या प्रकार जागा आल्या आहेत, ते पाहिल्यास अजित पवार यांनी भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर एकनाथ शिंदे यांची चांदी होईल. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपाला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी होईल. अशी सध्याची स्थिती आहे. मात्र, या गोष्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना माहित आहेत. त्यामुळे त्यांना भाजपाचं ऐकण्याशिवाय पर्याय नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच भाजपाचाच मुख्यमंत्री होईल हे ठरलेलं आहे. पण पंकजा मुंडे यांना देखील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद देणार असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे, असा दावा देखील रोहित पवार यांनी केला. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळते का? हे पाहावे लागेल.
हेही वाचा – Congress : नाना पटोलेंचे आरएसएसशी संबंध म्हणूनच…; पराभूत काँग्रेस उमेदवाराचा गंभीर आरोप
मंत्रिपदासाठी या महिला आमदारांची नावे चर्चेत
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा फायदा महायुतीला विधानसभेत झाल्याचे पाहायला मिळाले. महिलांना महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान दिले. याचपार्श्वभूमीवर आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात महिलांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ आणि श्वेता महाले या महिलांची नावे चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून मनीषा कायंदे आणि भावना गवळी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेचा पाठपुरावा करणाऱ्या अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचेही मंत्रिपदासाठी नाव समोर येत आहे.
हेही वाचा – Bjp News : भाजपच्या बड्या नेत्याचाही ‘ईव्हीएम’वर भरोसा नाही का? पडताळणीसाठी दाखल केला अर्ज