घरमहाराष्ट्रRohit Pawar : ...तर सरकारही गैरप्रकारांमध्ये सहभागी; रोहित पवारांचा टोला

Rohit Pawar : …तर सरकारही गैरप्रकारांमध्ये सहभागी; रोहित पवारांचा टोला

Subscribe

मुंबई : राज्य सरकारमधील विविध विभागांद्वारे शासकीय नोकर भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. मात्र या परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होताना दिसतात. या विरोधात विद्यार्थी आंदोलन करतात, परीक्षा रद्द करण्याची मागणी करतात, मात्र, सरकार पुरावे द्या, चौकशी करू अशी भूमिका घेते. दरम्यान, बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा अमरावतीत परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. मृद आणि जलसंधारण विभागाच्या या परीक्षेत अधिकारीच विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवत असल्याचे लक्षात आले. यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी, वारंवार अशाच गोष्टी घडत असतील तर सरकारही या गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे, हेच पुन्हा सिद्ध झालं, असं म्हणत सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ट्वीट करत टीका केली आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : राजकीय मैदान 57 वर्षांपासून गाजवणारा तेल लावलेला पैलवान म्हणजेच…

- Advertisement -

ट्वीटमध्ये रोहित पवार काय म्हणतात?

अनेकदा सांगूनही हे गोंधळलेलं सरकार #पेपरफुटी च्या घटनांना #Serious पणे घ्यायला तयार नाही. ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले त्या ठिकाणी सेंटर्स देऊ नका अशी वारंवार मागणी करूनही घमंडी सरकार कार्यवाही करत नसेल आणि त्याच सेंटर्सवर परीक्षा घेत असेल तर सरकारही या गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे, हेच आज पुन्हा सिद्ध झालं.
आज अमरावतीत गैरप्रकार घडला, उद्या दुसरीकडे घडेल, पण हे सरकार काहींही कारवाई करणार नाही. हे सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरून चाललंय. पेपरफुटी विरोधातील या लढ्यात मी तर सोबत आहेच पण आता विद्यार्थ्यांना स्वतःही लढा उभारावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही!

 सरकार कार्यवाही का करत नाही?

- Advertisement -

अशाप्रकारे परीक्षेत गैरप्रकार घडणं हे चूकच आहे. मात्र, अशा घटनांनंतरही सरकार काहीही कार्यवाही का करत नाही, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. सरकारला या प्रकरणांचे गांभीर्य नाही का? कारण, ज्या सेंटर्सवर अशा घटना घडतात, ती सेंटर्स पुढच्यावेळी परीक्षेसाठी देऊ नका, असं सांगूनही जर सरकार तिथेच परीक्षा घेत असेल, तर सरकारही या गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे का, असाच प्रश्न निर्माण होतो, असेही रोहित पवार म्हणतात. पेपरफुटीविरोधातील या लढ्यात आपण विद्यार्थ्यांसोबतच आहोत, पण विद्यार्थ्यांना स्वतःलाच हा लढा उभारावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – VHP : सिंहिणीच्या ‘सीता’ नावाला विहिंपचा आक्षेप, हायकोर्टाने दिले देवी दुर्गेचे उदाहरण

अमरावतीत काय घडले ?

अमरावती येथील एका ऑनलाइन परीक्षा केंद्रावर मृदा आणि जलसंधारण विभागाचा जलसंधारण अधिकारी गट ब या पदाच्या परीक्षेचा पेपर सुरू होता. यावेळी एक अधिकारी पेपर फोडून काही विद्यार्थ्यांना उत्तरं सांगत असल्याची माहिती समोर आली आहे. एक प्रवेशपत्र समोर आलं असून त्याच्यावर उत्तरांचे पर्याय छापलेले होते. संबंधित अधिकारी हा विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या मागे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची उत्तरे लिहून पुरवत होता. या गोष्टीचा अनेक विद्यार्थ्यांनी निषेध केला आहे. ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी इंजीनियरिंग असोसिएशनच्या अधिकृत ट्विटर पेजवरून करण्यात आली आहे. या संदर्भात नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

तलाठी भरती जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागात विविध पद्धतीने ऑनलाईन पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सातत्याने सरळसेवा भरती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत होती. तरीही खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने सरकारी भरती परीक्षांचे आयोजन केले जात आहे. यामध्येच अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. याविरोधात विद्यार्थ्यांनी सातत्याने आंदोलन करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे द्या, चौकशी करू, अशी भूमिका घेतली आहे. आता भविष्यात जर पुन्हा एकदा पेपरफुटी झाली तर सरकार काय खासगी कंपन्यांचे कंत्राट रद्द करणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -