युवा आंदोलन करतो तेव्हा त्यामागे कारण असतं, राजकारण नाही; रोहित पवारांची पडळकरांवर टीका

Rohit Pawar

एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश मिळालं असून शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे. मागणी मान्य केल्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान, युवा आंदोलन करतो तेव्हा त्यामागे कारण असतं, राजकारण नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पडळकरांवर टीका केली.

रोहित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज हा निर्णय घेतला गेला तर त्याचं श्रेय मुलांना जातं. याआधी देखील मुलांनी आंदोलन केलं होतं. तेव्हा देखील मुलांच्या बाजूने निर्णय घेऊ असं सांगण्यात आले होते. १५ दिवस उलथून गेल्यानंतरही त्यांनी निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा मुलांना आंदोलन करावे लागले. परंतु हा निर्णय १५ दिवसांतच घेतला असता तर मुलांना अभ्यास तरी करता आला असता, असं रोहित पवार म्हणाले.

जेव्हा युवा आंदोलन करतो. तेव्हा त्यामागे कारण असतं. राजकारण नसतं. याचा विचार करून निर्णय आधीच घेतला पाहीजे होता. पण काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उगाचच कुणी राजकीय श्रेय घेऊ नये, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू होणार आहे, मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. हे नियम २०२५ पासून लागू करण्याची विनंती करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या मागणीला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आता लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : हास्यजत्रा फेम अभिनेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ, अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी