‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने रोहित पवारांचा केंद्र सरकारला चिमटा

NCP MLA Rohit Pawar

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देणारे हटके ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. रोहित पवारांच्या ट्वीटवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. “हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे! हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय”, अशा आशयाचे ट्वीट रोहित पवारांनी केले आहे.

स्वयंपाकघराला पुन्हा एकदा महागाईची झळ

दरम्यान, सामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२० पासून घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली नव्हती. मात्र दिल्ली विधानसभेचा निकाल लागताच दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांतील गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. मुंबईत गॅसच्या किंमती या १४५ रुपयांनी वाढल्या असून आता सर्वसामन्यांना रुपये प्रती गॅस सिलिंडरमागे ८२९.५० मोजावे लागणार आहेत. यासह दिल्लीतील सिलिंडरच्या किंमतींमध्ये १४४.५० रुपयांची वाढ झाली असून ८५८.५० रुपये सिलिंडर झाले आहे.

रोहित पवारांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान रोहित पवार आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्यात न्यायालयीन लढाई सुरु झाली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राम शिंदे यांनी रोहित पवार यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबतची याचिका दाखल केली आहे. मतदारांमध्ये पैशांचं वाटप करुन रोहित पवार यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदारांमध्ये पैसे वाटल्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झाल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.