मुंबई : मागील वर्षी जे काही शिवसेनेसोबत घडले होते, त्याचीच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झाली आहे. ज्याप्रमाणे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले. तसाच काहीसे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत देखील होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे नेते असलेले प्रफुल्ल पटेल यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह त्यांनाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून वाद-प्रतिवाद होण्यास सुरुवात झाली आहे. (Rohit Pawar’s response to Praful Patel’s ‘that’ statement)
हेही वाचा – भाजपाचा उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसवर निशाणा; वेणुगोपाल म्हणाले, आमचा दृष्टीकोण स्पष्ट…
प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते. परंतु त्यांनी अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर ते कायमच अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी हा दावा करत म्हटले आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वांना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल 100 टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. तसेच पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.
परंतु, त्यांच्या या विधानांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “यालाच अहंकार म्हणतात. आम्हाला वाटायचे, भाजप आणि त्यांच्याच नेत्यांना अहंकार आहे. पण, भाजपमध्ये गेल्यावर अहंकार येण्यासाठी दोन महिने लागले. निवडणूक आयोग निकाल देईल, तेव्हा देईल. मात्र, निवडणूक आयोग आपलेच ऐकतात, असे भाजप नेते सांगतात. म्हणून पटेलांना अहंकार आलेला दिसत आहे. पक्षाचे चिन्ह असो किंवा नसो आमच्याकडे शरद पवार आहेत,” असे म्हणत रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्या विधानांवर पलटवार केले आहे.
तसेच, निवडणूक आयोगाच्या पूर्वीच हे स्व:घोषित निर्णय देत आहेत. याच्यातून समजून घ्यायचे की निवडणूक आयोग कदाचित भाजपचे ऐकत आहे. 1999 साली पक्षाची स्थापना झाल्यावर घड्याळाकडे नव्हे, तर शरद पवारांकडे जनतेने पाहिले होते. पक्षाचे चिन्ह असो किंवा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत. स्वार्थी राजकारण आम्हाला जमणार नाही, असा टोला देखील रोहित पवार यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.