Homeताज्या घडामोडीNCP Vs NCP : अजितदादांच्या आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी; अनिल देशमुखांचा दावा

NCP Vs NCP : अजितदादांच्या आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी; अनिल देशमुखांचा दावा

Subscribe

Winter Session नागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)  विधीमंडळातील कार्यालयावर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) दोन्ही गटांनी दावा केला आहे. शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, पक्ष कार्यालय आमच्याच ताब्यात आहे. आमच्यातील एक गट तिकडे (भाजपसोबत सत्तेत) गेला आहे. त्यांना वेगळे कार्यालय हवे असेल तर त्यांनी अध्यक्षांकडे तशी मागणी करावी.

उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशना दरम्यान आयोजित सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांना विचारण्यात आले, अजित पवार गटाच्या आमदारांना व्हीप काढला जाणार आहे का? त्यावर माजी गृहमंत्री म्हणाले, “मागच्या अधिवेशनात अजित पवार गटाचे आमदार कामकाजात सहभागी होत नव्हते. ते फक्त लॉबीमध्ये फिरत होते. त्या सर्व आमदारांना पुन्हा शरद पवारांकडे यायचे आहे, हे त्यांच्या वर्तनावरुन स्पष्ट होत होते. व्हीप काढायची वेळ आली तर नक्की काढू, त्यात काही अडचण नाही.”

अजित दादांच्या आमदारांची होणार घरवापसी

हिवाळी अधिवेशनापूर्वीच अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, “अजित दादांसोबत गेलेल्या आमदारांची पुढच्या काळात घरवापसी झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. अजित दादांसोबतच्या आमदारांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. त्यांना या सरकारकडून त्यांच्या मतदारसंघातील शक्य तेवढी कामे काढून घ्यायची आहेत. नंतर परत ते शरद पवारांकडे येणार आहेत. खूप मोठ्या संख्येने आमदारांची घरवापसी झालेली तुम्हाल दिसेल.” असा दावा देशमुखांनी केला.

संघर्ष यात्रेचा नागपूरमध्ये समारोप

आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा (Sangharsha Yatra) काढली आहे. 12 डिसेंबरला संघर्ष यात्रा नागपूरमध्ये दाखल होणार आहे. 800 किलोमीटर प्रवास करुन संघर्ष यात्रा नागपूरमध्ये पोहचत आहे. या यात्रेचा समारोप नागपूरमधील झीरो माईल (Zero Mile Stone) येथील सभेत होणार आहे. या सभेसाठी INDIA आघाडीतील नेत्यांना निमंत्रित केले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा : “आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे असून कारवाई केली नाही तर मुख्यमंत्री आरोपीच्या पिंजऱ्यात…”

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासहे इंडिया आघाडीत अनेक नेते उपस्थित राहाणार असल्याचे देशमुख म्हणाले.