अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. भाजपचे आमदार नितेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यामुळे हे दोन्ही आमदार कायमच त्यांच्यावर होणाऱ्या टीकांना कायमच प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. यावेळी तर या दोन आमदारांमध्येच वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी केलेल्या एका टीकेला रोहित पवार यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रोहित पवारांना अजून दाढी मिशाच फुटलेल्या नाही, या नितेश राणे यांच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणालेत की, मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत. ज्यामुळे त्यांच्यातील हा कलगीतुरा आणखी किती रंगतो, यांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना रोहित पवारांकडून हे वक्तव्य करण्यात आले आहे. (Rohit Pawar’s strong response to Nitesh Rane’s criticism)
हेही वाचा – दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शिंदे-फडणवीस-पवार मंत्रिमंडळासाठी पंचतारांकित बडदास्त
भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, रोहित पवार हे अजून एलकेजीमध्येच आहेत, त्यांना दाढी मिशाच फुटलेले नाही. परंतु, या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, . राणेंना कोंबडी आणि अंड्यात एवढा लगाव का आहे? याबाबत मला माहिती नाही. राणे माझ्या दाढीबद्दल बोलले, मात्र मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत, असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तसेच, यावेळी त्यांना 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीबाबत देखील विचारण्यात आले. त्यावर मत व्यक्त करत रोहित पवारांनी सांगितले की, निवडणूक आयोग काय निर्णय देतो ते पाहुयात. निवडणूक आयोग आणि त्याचे आयुक्त हे भाजपच्या हातचे बाहुले आहेत, पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
गेल्या 10 दिवसांपासून जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू आहे. रोहित पवार यांना या मुद्द्यावरून सुद्धा पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, खरंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी या उपोषणस्थळी भेट द्यायला हवी होती. मात्र ते कामात व्यस्त असावेत म्हणून ते आले नसावेत. पण धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असेच भाजपच्या नेत्यांना वाटतं नसावे. तर राम शिंदे यांच्या घराजवळ हे उपोषण सुरू असताना आणि त्यांचे सरकार असताना हे उपोषण सोडवण्यासाठी त्यांना एकही मंत्री आणता आला नाही, यावरून त्यांचे सरकारमध्ये किती वजन आहे याचा विचार करावा लागेल, असा टोला रोहित पवारांकडून लगावण्यात आला आहे.