आम्हाला मंत्रीपद दिलं म्हणजे मेहरबानी केली नाही, महादेव जानकरांचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर

रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उत्तर दिलं आहे. मला मंत्री केल्याचं आपण सांगताय. पण आम्ही युतीत होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे विसरु नका. आम्हाला मंत्रीपद दिलं म्हणजे तुम्ही मेहरबानी केली नाही, असा टोला महादेव जानकर यांनी फडणवीसांना लगावला आहे.

आम्हाला मंत्रीपद दिलं म्हणजे मेहरबानी केली नाही

माजी मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे पक्षातील सांगलीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्या करगणी येथील निवास स्थानी आले होते. त्यावेळी जानकर यांनी माध्यमांशी विविध राजकीय घडामोडींवर चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनेक वेळा सभांमधून रासपला मंत्रीपद दिल्याचा उल्लेख करतात. मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्ही मंत्रिपद दिलं म्हणजे आमच्यावर काही उपकार केले नाहीत. आम्ही तुमच्यासोबत होतो. आमचा पक्ष भाजपसोबत युतीत होता. त्यामुळे तुम्ही युतीचे मुख्यमंत्री होता. यात आमचाही वाटा आहे, असं महादेव जानकर म्हणाले.

भाजप आणि काँग्रेस पक्षाची धोरणे मात्र वेगळी

राज्यातील नेत्यांवर वारंवार पडणाऱ्या ईडीच्या छाप्याबाबत जानकर म्हणाले की, ईडीची कामगिरी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पर्वाच एका ज्वारी विकायला चाललेल्या शेतकऱ्यांशी बोलत होतो. तेव्हा ते म्हणाले की, साहेब इडी बिडी पाठवाल. विनोदाचा भाग सोडला, तर सर्वांना सारं समजतंय, काय चाललं आहे ते. सब समान, देश महान या धोरणाने रासपची वाटचाल सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाची धोरणे मात्र वेगळी आहेत, असं जानकर म्हणाले.

आम्ही युतीत होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात

तरुणांना काय हवे आहे ते कोणीच विचारत नाही. रासपची राज्यात दोन टक्के तरी मतं आहेत. आम्ही युतीत होतो म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री झालात. आम्ही हेलिकॉप्टरमधून फिरणारे नेते नाही आहोत. तर आम्ही शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणारे नेते आहोत, असं जानकर म्हणाले.


हेही वाचा : मोठी बातमी! हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा