राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरु

rss headquarters

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमधील मुख्यालयाला एका अज्ञाताने बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेमुळे आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेमुळे संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत मोठ्याप्रमाणात वाढ केली आहे. तसेच धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीबाबत आता पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. (rss headquarters in nagpur get bomb threat by unidentified caller security tightened says police)

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास नागपूरमधील पोलिस नियंत्रण कक्षेत एक निनावी फोन आला होता. यावेळी फोनवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. याबाबत नियंत्रण कक्षाने तात्काळ पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. ज्यानंतर QRT कमांडोसह पोलिसांच्या तुकड्या संघ मुख्यालयात पाठवण्यात आल्या. पोलीस उपायुक्तांनीही संघ मुख्यालात जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान आता संघ मुख्यालयाला उडविण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यात सायबर क्राईमच्या माध्यमातूनही निनावी फोन करण्याच्या आरोपीची शोध घेतला जात आहे.

गेल्या महिन्यात सचिन कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने संघ मुख्यालय उडविण्याची धमकी दिली होती, त्यावेळी त्याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी देखील पोलिसांनी असाच संशय व्यक्त केला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलीस विभागात खळबळ उडवण्यासाठी कोणीतरी ही धमकी दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेनंतर संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढविण्यात आली असून सायबर पोलिसांच्या क्राईम पथकाकडून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे, लवकरचं यातील आरोपीला अटक होईल, अशी माहिती झोन ३ चे पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली आहे.


अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपा आणि शिंदे गटाची संतप्त प्रतिक्रिया