सफाई कामगार किंवा वंचित घटकांतील व्यक्तींबरोबर भोजन करा; मोहन भागवतांचं स्वयंसेवकांना आवाहन

rss mohan bhagwat speech in madhya pradesh jabalpur said eat food with people and work

संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबियांनी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आणि पाश्चात्य कुटुंब पद्धतीपासून दूर राहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले आहे. यासोबत आठवड्यातून एकदा तरी सफाई कामगार किंवा समाजातील वंचित घटकातील लोकांसोबत बसून भोजन करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मध्य प्रदेशातील महाकौशल भागातील संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांनी रविवारी मोहन भागवत यांनी संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे. जबलपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या एम.एल.बाई शाळेच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात गाय पूजन, तुळशीपूजन, दीपप्रज्वलन आणि भारत मातेच्या पुष्पांजलीने केली.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या, वृत्तपत्रे आणणाऱ्या, दूध, सफाई कामगार किंवा समाजातील वंचित घटकातील कोणत्याही कुटुंबाला आपल्याकडे आमंत्रित करत त्यांच्या हिताची विचारपूस करावी आणि त्यांच्यासोबत आठवड्यातून एकदातरी भोजन करावे.

स्वयंसेवकांनी चांगले कार्य करून समाजात एक आदर्श निर्माण करावा, तसेच जातीवाद दूर करण्यासाठी कार्य करावे, समाजात सलोखा राखण्याबरोबर सर्वांना समानतेने वागले पाहिजे, असे आवाहनही भागवत यांनी केल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कुणाचीही जात विचारली जात नाही. किंबहुना प्रत्येकजण एकत्र भोजन घेतात, एकत्र कामही करतात. अशाप्रकारचे वातावरण तुमच्या प्रत्येक घरात तुम्ही तयार केले पाहिजे, असं आवाहनही सर संघचालकांनी संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबियांना केले आहे.


हेही वाचा : मुंबईतून ४०० आफ्रिकन नागरिकांची हकालपट्टी, भारतात राहण्यासाठी करतात गुन्हे