८ जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर जिवंत पकडले; १५० जणांच्या टीमचे यश

rt 1 tiger captured
नरभक्षक RT1 वाघ

चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन विभागाच्या पथकाने जिवंत पकडले. वाघाला शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. गेल्या काही महिन्यांत या आरटी-१ वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता, पण पुन्हा आज त्याला सापळा लावून पकडण्यात आले. वाघास जेरबंद केल्यानंतर राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

RT1 वाघ सुमारे वीस चौरस किलोमीटर परिसरात फिरत होता. त्याला पकडण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षक यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश दिलेले होते. तेव्हापासून वन विभागाची पथके या वाघाच्या मागावर होती. पण तो हुलकावण्या देत होता. रात्रीच्या अंधारातच त्याचा अधिक वावर होता. या वाघाला जिवंत पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २५ वनरक्षकांची चार पथके (STPF), १४ गावांतील ३५ स्वयंसेवक यांच्यासह ४ पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरेही लावण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ सापळ्यात अडकता-अडकता पिंजरा तोडून पळाला होता.

मागावर असलेल्या पथकांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. यात चांदा वन विभागातील राजूरा आणि विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावाजवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात हा वाघ अडकला. या वाघाला पशूवैद्यकीय पथकाच्या मदतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या वाघास जिवंत जेरबंद करण्यात आल्याने हे वन विभागाचे मोठे यश मानले जात आहे. या प्रयत्नांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाघाला जिवंत जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. वाघ जेरबंद झाल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

वन कर्मचाऱ्याला पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी लावली

RT1 वाघ पिंजऱ्यात अडकत नसल्यामुळे वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी लावण्यात आली होती. तीन शिफ्टमध्ये वन कर्मचारी पिंजऱ्यात बसत होते. वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यासाठी वन कर्मचारी पिंजऱ्याच्या एका टोकाला बसत असल्याची माहिती मध्यतंरी बाहेर आली होती, त्यानंतर वनविभागाच्या या कल्पनेवर बरीच टीका विरोधकांकडून झाली होती. तसेच आठ जणांना मारणाऱ्या वाघासमोर पिंजऱ्यात बसण्यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी देखील विरोध केला होता.