घरमहाराष्ट्रहे मेसेज तर दरवर्षीचेच त्यामागे कोणता कट?

हे मेसेज तर दरवर्षीचेच त्यामागे कोणता कट?

Subscribe

मराठा आरक्षणावरुन झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील विठ्ठलाची पूजा करण्यास नकार दिला आहे. वारकर्‍यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, महापूजेला जाणार नसल्याचा निर्णय घेतला. तर यावर्षी शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दांम्पत्यांना मिळाला आहे.

गर्दीत साप सोडणे, अफवा पसरवून चेंगराचेंगरी होईल अशी परिस्थिती निर्माण करणे, दगडफेक करणे असे मेसेज गुप्तचर खात्याकडून आषाढी एकादशीला दरवर्षी येत असतात. त्यादृष्टीने पोलीस सर्व तयारीही करतात इतकंच नव्हेतर साप पकडणार्‍यांनाही तैनात केले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की त्यामागे काही कट आहे तर ते किती खरं मानायचे? पोलीस त्यांची भूमिका चोख बजावतात. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री पंढरपुरला जात नसतील तर ते योग्यच आहे, असे केंद्रात आणि राज्यात गुप्तहेर खात्यात काम केलेल्या एका माजी अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. गुप्तचर खात्याला छोटासा जरी लिड मिळाला तरी त्यानुसार काळजी घेण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या जातात. केवळ पंढरपूरच नव्हेतर गर्दी होते त्या ठिकाणी चेंगराचेंगरीची शक्यता जास्त असते. त्यामुळे ती होऊ नये यादृष्टीने गुप्तचर खातेही कार्यरत असते, असेही त्या अधिकार्‍याने सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा पंढरपुरातील विठ्ठल पूजेला नकार

मराठा आरक्षणावरुन झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पंढरपुरातील विठ्ठल पूजेला नकार दिला आहे. तरीही सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य पोलीस दल सज्ज झाले आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंढरपुरातील सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात वारीची परंपरा खूप जुनी असून मुख्यमंत्र्याच्या हस्ते विठ्ठलाची पूजा केली जाते. ही आतापर्यंतची परंपरा सर्वच मुख्यमंत्र्यांनी पाळली आहे. मात्र मराठा आरक्षणावरुन प्रचंड वाद निर्माण झाल्यानंतर मराठा संघटनेने यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पंढरपूरात येऊ देणार नाही तसेच त्यांना विठ्ठलाची पूजा करु दिली जाणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री आता पंढरपूरात जाणार नाहीत.

- Advertisement -

पंढरपुरात कडक सुरक्षाव्यवस्था

मराठा आरक्षणावरुन पंढरपूरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. त्यासाठी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांना तिथे पाठविण्यात आले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनासाठी सुमारे सहा हजार पोलिसांचा फौजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन दिवसांपासून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून जागोजागी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍या व्यक्तींविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

-दत्ता पडसळगीकर, पोलीस महासंचालक

भाविकांमध्ये कोणीही गैरसमज पसरवू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक जमा होतात. या भाविकांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी पोलिसांवर आहे. भाविकांना कुठेही त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

-बिपीनबिहारी सिंग , अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)

पंढरपूर येथे मुख्यमंत्री येणार नाहीत, मात्र मुख्यमंत्री पंढरपुरात आल्यास तिथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. काही संघटना तणावाचे वातावरण निर्माण करु शकतात, अशा व्यक्तींवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी काही आक्षेपार्ह मॅसेज पाठविले जात आहेत, असे कोणतेही कृत्य पोलिसांच्या निदर्शनास आले नाही. मात्र भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे.

-कृष्णकुमार, पोलीस महानिरिक्षक, सुरक्षा विभाग

वारकर्‍यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, महापूजेला जाणार नाही – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात वारीची परंपरा ७०० वर्षांपासून आहे. वारीला छत्रपती शिवाजी महाराजांनीही संरक्षण दिले होते. त्यामुळे त्या काळातसुद्धा वारी अबाधित राहिली. आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांनी करण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे. ही पूजा राज्यातील १२ कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री करीत असतात. विठ्ठलाचा सेवक म्हणून हा मान मुख्यमंत्र्यांना असतो. आजवर ५ ते ६ वेळा ही पद्धत खंडित झाली. काही संघटनांनी अशी भूमिका घेतली की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ७६ हजार पदांची मेगा भरती रद्द करावी. तोवर आम्ही मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला येऊ देणार नाही. वारीच्या संदर्भात ही भूमिका अत्यंत चुकीची. वारी ही राजकीय आणि सामाजिक अभिनिवेशापलिकडे असली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना तसे तर कोणीही रोखू शकत नाही. परंतु १० लाख वारकर्‍यांच्या जीवाला धोका होईल असे प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांकडून तसे संदेश प्राप्त झाले, त्यात वारकर्‍यांमध्ये साप सोडणे, चेंगराचेंगरी होऊन त्यांच्या जीविताला हानी पोहोचवणे, असे प्रकार करणे, हे अतिशय वाईट आहे.

विठ्ठलाची पूजा मी माझ्या घरीही करू शकतो

पुरोगामी महाराष्ट्राला लज्जा आणणारा हा प्रकार आहे. १० लाख वारकर्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न पाहता या पूजेला न जाण्याचा निर्णय मी घेतला. कारण वारकर्‍यांना धक्का जरी लागला तरी, महाराष्ट्राला कधी कोणी माफ करणार नाही. माझ्या विठ्ठलाची पूजा मी माझ्या घरीही करू शकतो. मुख्यमंत्री पूजेला जातात, तो १२ कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून. परंतु अशापद्धतीने मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा प्रकार हा एकदम चुकीचा आहे. हा वारकर्‍यांना वेठीस धरणारा प्रकार आहे. असे लोक छत्रपतींचे मावळे कधीही असू शकत नाही. वारकरी हे भक्तीभावाने दर्शनाला येतात, म्हणून आपण हा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाचा निर्णय हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने मागासवर्ग आयोगाच्या नेमल्याशिवाय निर्णय होऊ शकत नाही, असे सांगितल्याने आयोग राज्य सरकारने नेमला.

दुर्दैवाने अध्यक्षांचे निधन झाले आणि आता दुसरे अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. जनसुनावणी होऊन काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पाहता हे सर्वांना समजते की, पुढचा निर्णय न्यायालयातच होईल. तरी सुद्धा काही पक्ष आणि संघटना राजकीय भावनेतून तेढ निर्माण करण्यासाठी वारकर्‍यांची सुरक्षा धोक्यात आणत आहेत. माझ्यावर दगडफेक करून आरक्षण मिळणार असेल, तर त्याचीही माझी तयारी आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही. यामुळे स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या नेत्यांचा बुरखा फाटला आहे.

ज्या ७२ हजार मेगाभरतीवर आक्षेप घेतला जात आहे. त्यात खरे तर आरक्षणाचा निर्णय गृहीत धरून १६ टक्के जागा अनुशेषातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेगाभरती थांबली तर एससी/एसटी/ओबीसीचे नुकसान होईल. ओपनमधून जे मराठा युवक नोकरीत लागतील, त्यांचे नुकसान होणार. ज्यांचे वय पात्रतेतून बाद होत आहे. अशा पात्र मराठा युवकांचे नुकसान होणार. भरती थांबवली, तर अनेक लोक वंचित राहतील. असे असले तरी १६ टक्के जागा या अनुशेष म्हणून राखीव ठेवण्यात येतील. काही लोक राजकारण करीत आहेत. शाहू, फुले, डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेताना, त्यांच्याच विचारांना हरताळ फासणार्‍यांना महाराष्ट्र माफ करणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -