Homeमहाराष्ट्रRupali Chakankar : बारामतीतील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबाबत चाकणकरांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या...

Rupali Chakankar : बारामतीतील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबाबत चाकणकरांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या…

Subscribe

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचे नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका करत म्हणाल्या की, “लग्नानंतर मुलीने सासरी लुडबूड करायची नसते. तिचे एकदा लावून दिले की तिने सासरीच नांदायचे असते. माहेरी किती लुडबूड करावी यालाही मर्यादा असतात.” परंतु, त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेतेमंडळींकडून टीका करण्यात आल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत पोस्ट करत चाकणकरांवर निशाणा साधला. मात्र, आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Rupali Chakankar explanation regarding statement made at event in Baramati)

हेही वाचा… Chitra Wagh : विरोधातला नवा आवाज सुप्रिया सुळेंना सहन होईना, चित्रा वाघ यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी (ता. 20 मार्च) बारामतीतील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ज्यानंतर सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची पोस्ट करत चाकणकरांना सुनावले. पण याबाबतचे स्पष्टीकरण देत रुपाली चाकणकर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबतच त्यांनी बारामतीतील कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ज्या पद्धतीने महिला आयोगाच्या गरिमेवर शिंतोडे उडविण्यात आले आहे, त्याविरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांच्याकडून देण्यात आली.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टला उत्तर देत लिहिले आहे की, “काहींनी अर्धवट ज्ञानाचा वापर करून, अर्धवट माहितीच्या आधारे, अर्धवट ट्वीट करून मुक्ताफळे उधळली (स्क्रिप्ट एकाच कार्यालयातून सगळ्यांना दिली असल्यामुळे एकच वाक्यरचना आहे.) त्याखाली असलेल्या अश्लाघ्य व अश्लील कमेंट वाचण्या लायकही नव्हत्या,आपण दुसर्‍याला ज्ञान शिकविण्याच्या तोऱ्यात एका महिलेच्या अब्रुचे धिंडवडे काढतोय यातही यांना अघोरी समाधान.” असा टोलाच चाकणकरांनी लगावला आहे.

तसेच, संपूर्ण भाषणात कोणाचेही नाव न घेता ट्वीट करणाऱ्या ज्ञानी लोकांनी कोणाचेतरी नाव लिहून भले मोठे ट्वीट लिहिले आहे. बहुतेक यांनीच ट्वीटमधून बदनामी करण्याचा विडा उचलेला दिसतोय. असो
आपल्या सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी खोटे ट्वीट करून आपल्या ढासळलेल्या बुद्धिमतेचे प्रदर्शन मांडले त्यांच्यासाठी हा खरा व्हिडीओ पोस्ट करत आहे, अशा खोचक शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. चाकणकरांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून ही पोस्ट केली आहे.

रुपाली चाकणकरांची पोस्ट…

राज्य महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने गेल्या सव्वा दोन वर्षात, बालविवाह, विधवा प्रथा मानवी तस्करी, कौटुंबिक हिंसाचार, महिला अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करत प्रत्येक जिल्ह्यात जनसुनावणी, ई-सायबर सुरक्षा मोहीम, टोल फ्री क्रमांकांच्या माध्यमातून तत्काळ दखल घेत कारवाई, जनता दरबाराच्या माध्यमातून हजारो पिडीतांना न्याय, 22 हजार केसेसचा निकाल, भरोसा सेल, दामिनी पथक यांच्या माध्यमातून युवतींची सुरक्षा, नोकरदार महिलांना अंतर्गत कमिटीच्या माध्यमातून सुरक्षाचे आत्मबळ, वयात येताना मुलींसाठी “सॅनिटरी बॅंक” तृतीयपंथीयसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था, अशा एक ना अनेक उपक्रम आयोगाने राबविले. यामुळे 30 वर्षात माहीत नसलेला आयोग सव्वा दोन वर्षात शहरी, ग्रामीण भागाबरोबरच वाड्यावस्त्यावर पोहचला, ही समाधानाची बाब…

कोठेही, कोणतीही घटना घडली की, आयोगाच्या अध्यक्षा कोठे आहेत असं विरोधक बोलतात तेव्हा खात्री पटते की काम उत्तम चालू आहे, कारण विरोधकांनाही विश्वास वाटतो की आयोगाने लक्ष घातले तर नक्की केस निकालात निघेल ही कामाची पावती. इतकं यशस्वी झालेल्या आयोगाच्या वतीने एका ग्रामीण भागातील कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना, आयोगाकडे येणाऱ्या घटनांमध्ये कौटुंबिक हिसांचाराच्या घटना या सर्वाधिक प्रमाणात असतात आणि यामध्ये सासरी गेलेल्या लेकीच्या संसारात आई जेव्हा जास्त लक्ष घालते तेव्हा कौटुंबिक कलह निर्माण होतात. तसंच सासरी गेलेली लेकही माहेरी जास्त लूडबूड करते तेव्हा माहेरी वाद निर्माण होतात. त्यामुळे आईनेही लेकीच्या संसारात फार लुडबूड करू नये आणि लेकीनेही माहेरी फार लुडबूड करू असं वक्तव्य अतिशय जाणीवपूर्वक महाराष्ट्रभर दौरा करून, कौन्सिलींग केलेल्या केसेसमधून, आलेल्या अनुभवातून मी सांगितले.

यावर काहींनी अर्धवट ज्ञानाचा वापर करून, अर्धवट माहितीच्या आधारे, अर्धवट ट्वीट करून मुक्ताफळे उधळली. (स्क्रिप्ट एकाच कार्यालयातून सगळ्यांना दिली असल्यामुळे एकच वाक्यरचना आहे) त्याखाली असलेल्या अश्लाघ्य व अश्लील कमेंट वाचण्या लायकही नव्हत्या, आपण दुसर्‍याला ज्ञान शिकविण्याच्या तोऱ्यात एका महिलेच्या अब्रुचे धिंडवडे काढतोय यातही यांना अघोरी समाधान.

ध चा म करत, मी न वापरलेले वाक्य माझ्या तोंडी देऊन माझी व संविधानिक पद असलेल्या आयोगाची जी गरिमा आहे, त्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहिर कार्यक्रम केला, याबद्ल जी मानहानी व बदनामी झाली त्याविरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र एक गोष्ट समजली नाही, मी संपूर्ण भाषणात कोणाचेही नाव घेतले नाही तरीसुद्धा ट्वीट करणाऱ्या ज्ञानी लोकांनी कोणाचेतरी नाव लिहून भलं मोठं ट्वीट लिहिले आहे. बहुतेक यांनीच ट्वीटमधून बदनामी करण्याचा विडा उचलेला दिसतोय…..असो. आपल्या सहकाऱ्यांना खुश करण्यासाठी खोटे ट्वीट करून आपल्या ढासळलेल्या बुद्धिमतेचे प्रदर्शन मांडले त्यांच्यासाठी हा खरा व्हिडीओ पोस्ट करत आहे. #राज्य_महिला_आयोग