‘केतकीचं तोंड काळं केल्याशिवाय शांती मिळणार नाही’, रूपाली पाटील संतापल्या

मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. केतकी अनेकदा सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडली आहे. तिच्या अशा वक्तव्यांमुळे सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत असतात. मात्र आता तिने पुन्हा असंच एक वादग्रस्त कृत्य केलेलं आहे. ज्यामुळे तिच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाउंटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टमध्ये अॅडव्होकेट नितीन भावे या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकीने शेअर केली आहे.

तिला जंगा चोप द्यायला हवा

केतकीच्या या आक्षेपार्ह वर्तवणूकीवर पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केतकीला जंगी चोप द्यायला हवा असं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “मला वाटतं की ती मुलगी मानसिक रूग्ण आहे. आपलं वय काय आपण बोलतो काय याचा जरा विचार करायला हवा. मला वाटतं तिला आता जंगी चोप देण्याची वेळ आली आहे. कारण तिच्यावर संस्कार व्यवस्थित झालेले दिसत नाहीत.आमचे कार्यकर्ते शरद पवारांना दैवत मानतात, ते आता शांत बसणार नाहीत. तिच्या घरात जाऊन तिला चोप देऊन तिचं तोंड काळं केल्याशिवाय आमच्या मनाला शांती मिळणार नाही.”

राऊतांची प्रतिक्रिया

“काही व्यक्ती हिमालयाएवढ्या असतात.तर काही व्यक्ती सूर्याच्या तेजासारख्या तळपत असतात. सूर्यावर कोणी थुंकलं किंवा हिमालयाला कुणी तोंड वेंगाळून दाखवलं तर हिमालय आणि सूर्याचं महत्त्व काही कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत यांना वेगळ्या प्रकारची नशा कुणीतरी चढवलेली आहे. महाराष्ट्रात आणि देशात असे क्षुद्र किटक वावरत असतात. खिडकी उघडली आणि हवा आली.

जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

“ते मनानं खूप मोठे आहेत. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. त्यांना नरक मिळालं पाहिजे. ८३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तुम्ही असं बोलू शकत नाही. कोणाच्या व्यंगावर आजारावर टीका करायची नाही हे आपल्याला महाराष्ट्र धर्मानंच शिकवलं आहे.”

केतकीवर दोन गुन्हे दाखल

केतकी विरोधात ठाण्यातील कळवा आणि पुणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.


हेही वाचा :नाशकात साकारली छत्रपती संभाजीराजेंची विश्वविक्रमी मुद्रा