वैयक्तिक कर्जासह गृह, वाहन कर्ज महागले

भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)ने शुक्रवारी रेपो रेट अर्धा (०.५०) टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे रेपो दर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. ८ जून रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केल्याने रेपो दर ४.९० टक्क्यांवर पोहोचला होता.

भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)ने शुक्रवारी रेपो रेट अर्धा (०.५०) टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे रेपो दर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. ८ जून रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केल्याने रेपो दर ४.९० टक्क्यांवर पोहोचला होता. प्रचलित प्रतिकूल जागतिक वातावरण, देशांतर्गत आर्थिक व्यवहारातील लवचिकता आणि चलनवाढीचा उच्च स्तर लक्षात घेऊन धोरणात्मक रेपो दर अर्ध्या टक्क्यांनी वाढवल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या व्याजदरवाढीमुळे वैयक्तिक कर्जासोबतच गृह आणि वाहन कर्जाचे हप्ते (ईएमआय) देखील वाढणार आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर चांगलाच ताण येणार आहे. (Home auto loans along with personal loans become expensive)

बुधवारपासून सुरू झालेली आरबीआयची पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) बैठक ३ दिवस चालली. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या बैठकीचे निर्णय शुक्रवारी ५ ऑगस्टला जाहीर करण्यात आले. त्यानुसार जगभरात मध्यवर्ती बँकांकडून एक टक्का, पाऊण टक्का मात्रेने व्याजदरवाढ होत आहे. त्या तुलनेत अर्धा टक्के रेपो दर वाढ ही आजच्या जागतिक वातावरणात सामान्यच ठरते, असे म्हणत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या सलग तिसर्‍यांदा केल्या गेलेल्या व्याजदरातील वाढीचे समर्थन केले.

४ महिन्यांत १.४० टक्क्यांची वाढ
रेपो दर वाढीच्या निर्णयासहित, २०२२ मध्ये गेल्या ४ महिन्यांत आरबीआयने आतापर्यंत १.४० टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे. चालू वर्षात मे महिन्यापासून झालेल्या या तिसर्‍या वाढीने, रेपो दर कोरोनापूर्व ५.१५ टक्क्यांच्या पातळीच्या पुढे गेला असून ऑगस्ट २०१९ नंतरचा त्यांचा उच्चांकी स्तर आहे.

रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यावसायिक बँकांना कर्ज देते तो दर. या कर्जाच्या व्याजदारांना आधारभूत दर मानून बँका वैयक्तिक, गृह, वाहन इत्यादी कर्जांचे दर ठरवतात.

आर्थिक वृद्धी दर २०२२-२३ साठी ७.२ टक्के राहील
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वृद्धीबाबतचा आरबीआयचा अंदाज कायम असून चालू आर्थिक वर्षात ७.२ टक्के वर कायम ठेवण्यात आला आहे, अशी माहिती गव्हर्नर दास यांनी दिली. पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के; दुसर्‍या तिमाहीत ६.२ टक्के; तिसर्‍या तिमाहीत ४.१ टक्के; आणि चौथ्या तिमाहीत ४.० टक्के इतका राहील. २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर ६.७ टक्के राहील, असा अंदाज आहे.

असा वाढेल ईएमआय
वाढत्या महागाईकडे पाहता गृहकर्जांचे व्याजदर ६.५-७ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार तुम्ही एप्रिल २०२२ मध्ये २० वर्षांच्या कालावधीसाठी ७ टक्के दराने ३० लाख रुपयांचे गृहकर्ज आधीच घेतले असल्यास, तुमचा ईएमआय २३,२५९ रुपयांवरून २५,८४५ रुपये होईल. ३ वेळा रेपो दर वाढीनंतर गृहकर्जाचे व्याजदर ७ टक्क्यांवरून ८.४ टक्क्यांवर गेल्यास मासिक ईएमआयमध्ये रु. २,५८६ ची वाढ होईल.