बिनचेहऱ्यांचे आणि बिनखात्याचे नामुष्की सरकार; शिंदे फडणवीस सरकारच्या खातेवाटपावर सामनातून हल्लाबोल

अनेक दुःखी आणि 'सुप्त ज्वालामुखी' शिंदे-फडणवीस सरकारात आहेत आणि त्यांचे कधी स्फोट होतील याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्यापि खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे

eknath shinde devendra fadanvis
eknath shinde devendra fadanvis

एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला खरा. मात्र मंत्रिमंडळ विस्तारातील खातेवाटपावरून आता शिंदे आणि भाजपमध्ये एकमत होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच दोन्ही गटातील अनेक आमदार मंत्री न मिळाल्याने ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. यावर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जात आहे. दरम्यान आजही शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातून शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपावरून हल्लाबोल करण्यात आला. तसेच अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सामानातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे. असं म्हणत सामनातून शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे.

मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळण्यासाठी रस्सीखेच

3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे. अशा शब्दात टीका केली आहे.

हेही वाचा : भाजपला प्रादेशिक पक्ष आणि मित्र पक्ष संपवण्यातच अधिक रुची, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाळणा 40 दिवसांनंतर हलला खरा, पण आता त्याचे खातेवाटप लटकले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटले आहेत. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे; पण राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे ना जिल्हय़ा-जिल्हय़ांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस लागले; आता त्यातील खातेवाटपासाठीही घोळात घोळ सुरू आहे. 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दोऱ्या आहेत आणि त्या आतल्या-बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहेत ते त्यांना हव्या असलेल्या खात्यांसाठी, तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीचा ‘झटका’ देत आहेत. अशी टीका सामनातून करण्यात आली.

दोघांचेही दुसरे नाव ‘विश्वासघात’, ‘धोका’ हेच…

शिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही दोन दिवसांपूर्वी असाच झटका दिला होता. बच्चू कडू हे ज्येष्ठ अपक्ष आमदार आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही ते मंत्री होते. मात्र शिंदे गटाने बंडखोरी केली तेव्हा त्यांना सुरुवातीपासून साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांत ते अग्रेसर राहिले. त्यामुळे नव्या सरकारच्या पहिल्या पाळण्यात आपल्यालाही जागा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे ते नाराज झाले. आपली ही नाराजी क्षणिक आहे, असा खुलासा त्यांनी केला असला तरी अत्यंत ‘कडू’ शब्दांत त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना ‘डोस’ पाजले. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, ‘जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसविले आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसविले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यमान सरकारवर निशाणा साधला. पुन्हा त्यांनी या सरकारचे जाहीर ‘बारसे’ही करून टाकले आहे. ‘धोका देणाऱ्यांचे राज्य’ असे नामकरण त्यांनी या सरकारचे केले आहे. ‘जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार आणि त्यालाच मंत्रीपद मिळणार,’ अशा शब्दांत बच्चू यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे ‘कडू’ सत्य पुन्हा चव्हाटय़ावर आणले. अर्थात त्यात नवीन काय आहे? शिंदे गट काय किंवा त्यांना मांडीवर घेणारा भाजप काय, दोघांचेही दुसरे नाव ‘विश्वासघात’, ‘धोका’ हेच आहे. अशी जहरी टीका शिंदे – फडणवीस यांच्यावर करण्यात आली.

हेही वाचा : ठाकरे सरकारमुळे अडलेले काम शिंदेंमुळे पूर्ण झाले, सदा सरवणकर यांचा खुलासा

शब्द द्यायचा नंतर फिरवायचा ही तर भाजपची रीत

शब्द द्यायचा आणि नंतर फिरवायचा ही तर भाजपची रीतच आहे आणि त्याचा प्रत्यय 2019 मध्ये महाराष्ट्राला आलाच आहे. त्याआधीही 2014 मध्ये शेवटच्या क्षणी त्यांनी विश्वासघात केलाच होता. शिंदे गटाने तरी दुसरे काय केले आहे? त्यांचा मुखवटा हिंदुत्व वगैरेचा असला तरी मूळ चेहरा विश्वासघात आणि धोकेबाजीचाच आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून बनविलेले सरकार ‘धोका देणाऱ्यांचे’च आहे. बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाचा पाळणा हलला असता तर त्यांना या ‘धोक्या’चा साक्षात्कार कदाचित झाला नसता; पण तसे झाले नाही आणि शिंदे-फडणवीस सरकारचे ‘कडू’ सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. अर्थात असे अनेक दुःखी आणि ‘सुप्त ज्वालामुखी’ शिंदे-फडणवीस सरकारात आहेत आणि त्यांचे कधी स्फोट होतील याचा काहीच भरवसा नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्यापि खातेवाटप होऊ शकलेले नाही. ही नामुष्कीच आहे. असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

…कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे

मुळात हे सरकारच अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसले आहे. त्यापैकी कुठल्या ना कुठल्या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक, त्याचे हादरे, लाव्हारसाचे चटके या सरकारला अधूनमधून बसणारच आहेत. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी दिला. शिवाय ज्या मुद्दय़ांसाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले आहे ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू, असे ‘गुद्दे’ही सरकारला लगावले. 3 दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार बिनमंत्र्यांचे होते. 40 दिवसांनंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या ‘नाकीनऊ’ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्याला तीन दिवस उलटले तरी खातेवाटपाचे ‘बारसे’ होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार ‘संधीसाधूं’चे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात ‘संधी’ मिळाली ते ‘साधू’ बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशा शब्दात शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.


महागाई नीचांकी पातळीवर, जुलै महिन्यातील आकडे दिलासा देणारे