घरमहाराष्ट्रहे चालले दावोसला बर्फ उडवायला, योगींनी मुंबईतून 5 लाख कोटी उडवले; शिवसेनेची...

हे चालले दावोसला बर्फ उडवायला, योगींनी मुंबईतून 5 लाख कोटी उडवले; शिवसेनेची शिंदे गटावर सडकून टीका

Subscribe

एकीकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौरा करत राज्यातील उद्योजकांशी चर्चा करत अनेक गुंतवणूक आपल्या राज्यात नेली आहे. तर दुसरीकडे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत दावोसाचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातही मोठी गुंतवणूक आणण्यासाठी हा दौरा असल्याचे म्हटले जातेय. या मुद्द्यावरून आज शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे. योगी मुंबईतून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेत आहेत व मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व त्यांचे बिऱ्हाड पुढील महिन्यात गुंतवणूक आणण्यासाठी जर्मनीतील दावोसला बर्फात खेळण्यासाठी, बर्फ उडवण्यासाठी चालले आहेत, अशा शब्दात शिवसेनेने शिंदे गटावर आणि भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

तीन महिन्यांपूर्वी केलेल्या ‘क्रांती’वर थुकरट भाषणे

अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगी महाराजांनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार. पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी. पुन्हा जमले तर शिवसेनेच्या महावृक्षाखालचा पाचोळाही गोळा करायचा आहे. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या ‘क्रांती’वर थुकरट भाषणे करायची आहेत. महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ आहेच कुठे? असा सवाल करत सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणीत, त्या पालापाचोळ्यासमोर दंड ठोकून भाषण 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न घेऊन मुंबईत आले. मुंबई निवासी बडय़ा उद्योगपतींना उत्तर प्रदेशात येण्याचे निमंत्रण दिले. योगींच्या मुंबई भेटीत मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला अशा अनेक बडय़ा उद्योगपतींच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. पंतप्रधानांच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योगपतींशी चर्चा करीत होते. येथील गुंतवणूकदारांना लखनौला येण्यासाठी निमंत्रित करीत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा-कचरा गोळा करून ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणीत होते व त्या पालापाचोळय़ासमोर दंड ठोकून भाषण करीत होते, अशी जहरी टीका मुख्यमंत्री शिंदेंवर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस बिऱ्हाड घेऊन जर्मनीतील दावोसला बर्फात खेळण्यासाठी, बर्फ उडवण्यासाठी चालले 

उत्तर प्रदेश-बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन येथील गुंतवणुकीची लूट करीत आहेत व मुख्यमंत्री शिवसेना पह्डण्याच्या कामात रमले आहेत. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद मिळाले की हे असे घडायचेच. योगी मुंबईतून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेत आहेत व मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व त्यांचे बिऱहाड पुढील महिन्यात गुंतवणूक आणण्यासाठी जर्मनीतील दावोसला बर्फात खेळण्यासाठी, बर्फ उडवण्यासाठी चालले आहेत. असा आरोपही सामनातून शिंदे फडणवीस सरकारव करण्यात आला आहे.

- Advertisement -

‘मॅचफिक्सिंग’ करून फक्त गुजरातलाच पुढे खेचण्याचे धोरण

योगींनी येथील उद्योगपतींना सांगितले, ”उत्तर प्रदेशात तुम्ही आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील याची हमी देतो.” महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. महाराष्ट्रातून गेल्या पाच महिन्यांत वेदांत फॉक्सकॉन, ड्रग्ज पार्क, एअर बससारखे प्रकल्प बाहेर गेले. सध्याच्या सरकारवर विश्वास नसल्यामुळेच हे झाले. योगी उत्तर प्रदेशातील सिनेसृष्टीच्या प्रकल्पावर जोर देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर ठेवलेल्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देशातील प्रमुख राज्यांत स्पर्धा लागली आहे, पण ‘मॅचफिक्सिंग’ करून फक्त गुजरातलाच पुढे खेचण्याचे धोरण स्पष्ट दिसते व ते राष्ट्रासाठी घातक आहे, असा आरोपही शिंदे फडणवीस सरकारवर शिवसेनेने केला आहे.

राज्यात उद्योग फुलावा-फळावा यासाठी शिंदे-फडणवीस काय करीत होते?

आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 82.50 इतके घसरले. हे काही आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. मोदींच्या काळात रुपया कोसळलाय तो उभाच राहायला तयार नाही. 2021-2022 चे आर्थिक विकास दराचे आकडे समोर आले आहेत. अर्थ मंत्रालयाने सर्व राज्यांना ‘स्टेट्स ग्रोथ रेट रिपोर्ट’ पाठवले. त्यात अनेक राज्यांची उघडी-नागडी स्थिती समोर आली. पहिल्या पाचांत एकही भाजपशासित राज्य नाही व महाराष्ट्र तर पहिल्या पंधरामध्येही नाही. राजस्थान हे काँग्रेसशासित राज्य 11.04 टक्के असा उत्तम आर्थिक दर बाळगून आहे. पहिल्या क्रमांकावर आंध्र प्रदेश असून त्यांचा विकास दर 11.43 टक्के आहे. हिंदुस्थानचा विकास दर 8.7 टक्के आहे व त्याच्यावर राजस्थानने विक्रमी विकास दर गाठलाय. त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय, झारखंड, हिमाचल प्रदेशसारखी राज्ये या बाबतीत पुढे आहेत. मुंबईत अवतरलेल्या उत्तर प्रदेशचा विकास दर 4.24 इतकाच आहे. या सगळय़ांच्या मागे महाराष्ट्र आहे, असे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे आकडे व रेकॉर्डस् सांगतात. ज्या महाराष्ट्राचा विकास दर कोसळला आहे त्या महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन योगी महाराजांनी तब्बल 5 लाख कोटींची गुंतवणूक त्यांच्या उत्तर प्रदेशात नेली, असे त्यांनीच जाहीर केले. मग ही गुंतवणूक महाराष्ट्रातच राहावी, येथे उद्योग फुलावा-फळावा यासाठी शिंदे-फडणवीस काय करीत होते? असा सवासही शिवसेने सरकारला विचारला आहे.

बेरोजगारांप्रमाणेच बेघर गोरगरीबांचेही तळतळाट या सरकारला लागतील

महाराष्ट्रातील मोठे उद्योग प्रकल्प गुजरातला जात असतानाच आता मिंधे सरकारच्या दफ्तरदिरंगाईमुळे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली सुमारे 1 लाख 16 हजार 955 घरेदेखील दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता असल्याची बातमी आहे. गरीबांसाठीच्या या घरकुलांना राज्य सरकारने केवळ वेळेत मंजुरी न दिल्यामुळे ही नामुष्की ओढवते आहे. या घरकुलांविषयी 27 डिसेंबर रोजीच राज्य सरकारला केंद्र सरकारने एक पत्र पाठवून या घरकुलांना मंजुरी देण्यासाठी 31डिसेंबरची मुदत दिली होती. घरकुलांना या मुदतीपूर्वी मंजुरी न दिल्यास ही घरे इतर राज्यांकडे वळवू असा इशाराच केंद्र सरकारने दिला होता. त्यानंतर मिंधे सरकारला जाग आली व घरकुलांच्या मंजुरीसाठी केंद्राकडे 6 जानेवारीपर्यंतची मुदत मागण्यात आली. ही डेडलाइनही आज संपली. निर्धारित कालावधीत केवळ मंजुरीअभावी रखडलेली ही घरेही उद्योगांप्रमाणेच दुसऱ्या राज्यांमध्ये जाणार असतील तर बेरोजगारांप्रमाणेच बेघर गोरगरीबांचेही तळतळाट या सरकारला लागतील, अशी संतप्त प्रतिक्रिय शिवसेनेने शिंदे फडणवीस सरकारवर व्यक्त केली आहे.

शिवसेनेचा काव्यत्मपद्धतीने सरकारवर हल्लाबोल 

गुजरातने साधारण दोन-अडीच लाख कोटींची गुंतवणूक नेली. आता योगी महाराजांनी 5 लाख कोटी नेले. मुंबईस लुटून महाराष्ट्रास पंगाल केले जात असताना आमचे राज्यकर्ते क्षुद्र राजकारणात लोळत पडले आहेत. यावर साधे हूं का चूं करायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे व्यावसायिक परममित्र अजय आशर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी ‘मैत्री’ नामक संस्था उभी केली. त्या ‘मैत्री’ने ही गुंतवणूक बाहेर कशी जाऊ दिली? की या पाच लाख कोटींमागे टक्केवारीचे ‘समृद्धी’ हिशेब झाले. सरकारचे जे बिऱ्हाड दावोसला बर्फ उडवायला निघाले आहे त्या बिऱ्हाडात या अजय आशरचाही समावेश आहे हे विशेष. मुंबईतील गुंतवणूक दुसरेच लोक पळवत आहेत व आपले सरकार परदेशी गुंतवणुकीसाठी दावोसला निघाले म्हणजे-

मधु मागशी माझ्या
सख्या परी
मधु घट हे रिकामे
पडती घरी…

याच काव्यपंक्तीप्रमाणे चालले आहे. अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगी महाराजांनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार. पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? असा सवाल उपस्थित करत शिंदे सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.


‘त्या’ वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -