घरमहाराष्ट्रमोदींशी 'वाकडं-तिकडं' काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे? - शिवसेना

मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे? – शिवसेना

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घअया असं सांगणारं पत्र शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली. अखेर प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून रोखठेक भूमिका जाहीर केली आहे. प्रताप सरनाईक यांनी जे मोदींशी जुळवून घेण्याची भाषा केली आहे, त्यावर शिवसेनेने मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे? असा सवाल केला आहे.

“पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘वाकडे-तिकडे’ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे?” असा सवाल करत तरीही ‘ विनाकारण त्रास ‘ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल, असा पवित्रा देखील शिवसेनेने घेतला आहे.

- Advertisement -

“केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱया केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय कामांसाठी वापर होत आहे,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की…

“महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱया प्रत्येकाने करायलाच हवा. बरे-वाईट दिवस येतच असतात. वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते. अर्जुनासारखे लढायचे, शिवाजी महाराजांसारखे शत्रूवर चाल करून जायचे की शत्रूशी ‘तह’ करून मांडलिकी पद्धतीने गुजराण करायची? मोगलांपुढे शिवरायांनी जुळवून घेतले असते तर दऱ्याखोऱ्यांत भटकून लढाया करण्याचे जीवन त्यांच्या नशिबी आले नसते,” अशा शब्दांत शिवसेनेने त्यांच्या नेत्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -