‘मराठी’ प्रश्नावर काही करता आलं नाही, आता हिंदुत्व झेपणार का? सामनातून टीका

Uddhav Thackeray and Raj Thackeray
सामनातून मनसेवर टीका

मागच्या १४ वर्षात राज ठाकरे यांना मराठी प्रश्नावर काही भव्य काम करता आले नाही. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाग्य आजमवता येईल काय? याबाबत शंकाच जास्त आहेत. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. विचार उसना असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधतानाच पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्यांना हाकलून द्यायलाच पाहीज, याविषयी कुणाचेही दुमत नाही, असेही अधोरेखित करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी मनसेने पक्षाचा झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची असल्याचे सांगितले आहे. तसेच एक नव्हे तर दोन दोन झेंडे ठेवणे हे तर गोंधळलेल्या मनःस्थितीचे लक्षण असल्याचीही टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले, याला रंग बदलणे कसे म्हणता येईल? याबाबत कुणाला आक्षे नसून पोटदुखी जास्त आहे. भाजपने कुणाबरोबरही युती केलेली जालते. मात्र इतर पक्षांनी युती केल्यास ते पाप कसे ठरते. आमचे सरकार समाजकार्यासाठी स्थापन झाल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे. भाजपने जे मागच्या पाच वर्षात केले नाही, ते काम महाविकास आघाडी सरकारने पन्नास दिवसांत केले आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार पडत नाही याची खात्री पटल्यानंतर पुन्हा जुनीच प्यादी रंग बदलून पटावर नाचवली जात आहेत,

राज ठाकरे अचानक बदलले

एक महिन्यापूर्वीच राज ठाकरेंनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला होता. आता ते कायद्याच्या समर्थनासाठी मोर्चा काढणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आर्थिम मंदी, बेरोजगारीवरुन लक्ष हटविण्यासाठी हा कायदा समोर आणत असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. आता तेच राज ठाकरे त्या खेळीचे यशस्वी बळी ठरले असून त्यांनी सीएए कायद्याच्या पाठिंब्याचा झेंडा खांद्यावर घेतला आहे, असेही या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.