संजय राऊतांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई – सचिन अहिर

Sachin Ahir

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता सुप्रीम कोर्टामध्ये युद्ध सुरू झाले आहे. महाराष्ट्रात राजकीय नाट्याला आता खरी सुरूवात झाली आहे. बंडखोर आमदारांना अस्थिर वाटू लागल्यानंतर त्यांना आसामच्या गुहावाटी येथील हॉटेलमध्ये हलवलं. त्यानंतर दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावली आहे. दरम्यान, संजय राऊतांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई केली जातेय, असं आमदार सचिन अहिर म्हणाले.

संजय राऊतांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई

सचिन अहिरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया ही विधानसभा उपाध्यक्षांच्या टेबलवर सुरू आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्याप घेतलेला नाहीये. तोपर्यंत यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्या ज्ञानानुसार, सुप्रीम कोर्टातून विधानसभेचा निर्णय येईपर्यंत यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, असं सचिन अहिर म्हणाले.

संजय राऊतांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी आहे. यावेळी दबावतंत्र वापरलं जातंय. ही चौकशी नंतरही करता आली असती. पण संजय राऊतांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवाल सचिन अहिर यांनी विचारला.

महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला

आमदारांनी प्रत्येक न्यायालयात जाणं ही घाई झाल्याचं दिसतंय. शिवाय महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला हे न्यायालयाला सांगितले, म्हणजे न्यायालय शासनाला आदेश देतील असं कधी होत नाही, घटनेनुसार विधीमंडळ, मग राज्यपालांकडे प्रकरण जातं. त्यामुळे तुर्तास तरी न्यायालयात जाऊन सांगणं हे घटनेत बसत नाही, असं सचिन अहिर म्हणाले.


हेही वाचा : शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणी होणार ११ जुलैला