घरताज्या घडामोडीविरोधकांची मते फुटली, सत्ताधा-यांनीच मारली बाजी ; घोटी सरपंचपदी सचिन गोणके यांचा...

विरोधकांची मते फुटली, सत्ताधा-यांनीच मारली बाजी ; घोटी सरपंचपदी सचिन गोणके यांचा १२ मतांनी विजय

Subscribe
इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घोटी ग्रामपालिकेच्या सरपंचपदासाठी अत्यंत अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली. सरपंचपदासाठी दोन अर्ज आल्याने मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरपंचपदी सचिन गोणके यांची निवड झाली. विरोधकांची मते फुटल्याने आश्चर्याचा धक्का बसला. सचिन गोणके यांना १६ पैकी १२ मते मिळाली.
थेट निवडणूकद्वारे सरपंचपदी निवडून आलेले प्रा. मनोहर घोडे यांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवड प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी शाम बोरसे हे होते. आज सकाळी ११ वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली. सरपंच पद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सरपंच पदासाठी सचिन दत्तात्रय गोणके व सौ अर्चना घाणे यांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत गोणके यांना १२ मते तर सौ. घाणे यांना अवघी चार मते मिळाली यावेळी एक सदस्य गैरहजर होते. सरपंच म्हणून सचिन गोणके यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी सभागृहात उपसरपंच संजय आरोटे, सदस्य रामदास भोर, गणेश गोडे रविंद्र तारडे, संजय जाधव, श्रीकांत काळे, स्वाती कडू, अरुणा जाधव, रुपाली रुपवते, कोंड्याबाई बोटे, वैशाली गोसावी, मंजुळा नागरे, सुनंदा घोटकर, सुनीता घोटकर आदी सहभागी झाले होते. ग्रामविकास अधिकारी धिंदले व पंचायत समितीचे अधिकारी संदीप दराडे यांनी सहायक अधिकारी म्हणून कांम पाहिले.
या निवडीप्रसंगी माजी सरपंच प्रा. मनोहर घोडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती पा. जाधव, माजी सरपंच रामदास शेलार, माजी सरपंच संतोष दगडे, बाजार समिती संचालक सुनील जाधव, समाधान जाधव, अनिल काळे, ह भ प मोहन भगत, विश्वनाथ कडू, भरत आरोटे, गणेश काळे, विलास रुपवते, हिरामण कडू, जगन म्हसने विकास जाधव, बाळूशेठ पीचा आदी उपस्थित होते.

वडील, बहिणी पाठोपाठ भावाच्याही गळ्यात सरपंचपदाची माळ

घोटीतील गोणके परिवार राजकारणात उजवे ठरले आहे. घोटी ग्रामपालिकेत गतवर्षी पहिल्यांदाच सचिन गोणके हे वॉर्ड क्र. ६ मधून सदस्य म्हणून निवडून आले. वर्षभरातच त्यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली. सचिन गोणके यांच्या यांचे वडील दत्तात्रय गोणके हे इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील सरपंच होते. तर सचिन यांच्या भगिनी कोमल गोणके या मागील टर्ममध्ये घोटी ग्रामपालिकेच्या सरपंच होत्या. त्यामुळे वडील, बहिणी पाठोपाठ सचिनच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडल्याने एकाच कुटुंबातील सदस्य सरपंच पदाचे मानकरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -