Homeमहाराष्ट्रSachin Pilot : जीएसटीच्या कररचनेत बदल करा; काँग्रेस नेत्याची मागणी

Sachin Pilot : जीएसटीच्या कररचनेत बदल करा; काँग्रेस नेत्याची मागणी

Subscribe

देशातील नोकरदार, मध्यमवर्ग आणि  सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मूठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पात जीएसटीमध्ये बदल करत जीएसटी 2.0 आणावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी केली.

मुंबई (प्रेमानंद बचाव) : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग आणि  सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मूठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पात जीएसटीमध्ये बदल करत जीएसटी 2.0 आणावा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी आज, गुरुवारी (9 जानेवारी) केली. (Sachin Pilot demands changes in GST tax structure)

केंद्र सरकारचा सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी आज काँग्रेसच्या गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या जीएसटी कर रचनेवर टीका केली. केंद्र सरकारने आगामी अर्थसंकल्पात जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन जीएसटी या अत्यंत किचकट, दहशत निर्माण करणाऱ्या कर रचनेत बदल केला पाहिजे. 2021-22 या वर्षात एकूण जीएसटीपैकी जवळपास दोन तृतीयांश किंवा 64 टक्के लोकसंख्येच्या तळातील 50 टक्के लोकांकडून आले.  तर फक्त 3 टक्के जीएसटी वरच्या 10 टक्के लोकांमधून आला. आरोग्य विमा सारख्या अत्यावश्यक सेवांवर जीएसटी दर हा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 18 टक्के आहे. तसेच पॉपकॉर्नवर सुद्धा तीन प्रकारचा जीएसटी लावला जात आहे, याकडे पायलट यांनी लक्ष वेधले.

 

मोदी सरकार दरवर्षी विक्रमी जीएसटी गोळा करत असल्याचा दावा करते. पण जेव्हा श्रीमंतांचा विचार केला जातो तेव्हा 2019 मध्ये कॉर्पोरेट करात 2 लाख कोटी रुपयांची कपात केली. पंतप्रधान मोदी श्रीमंतांसाठी मोठी कर कपात देतात आणि गरीब, मध्यमवर्गांवर मात्र करांचा भार टाकतात. जीएसटीची विक्रमी वसुली होत असून देशातील सर्वात जास्त जीएसटी मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य जनतेकडून जमा होतो. या घटकावरचा जीएसटीचा भार कमी करण्याची वेळ आली असून त्यादृष्टीने सरकारने निर्णय घ्यावा, असे आवाहन पायलट यांनी केले.

हेही वाचा – Delhi Election 2025 : पृथ्वीराज चव्हाणांच्या भविष्यवाणीवर कॉंग्रेस भडकली; संदीप दीक्षित म्हणाले…

भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे. पण खरे चित्र  वेगळेच आहे. जीडीपीमध्ये मोठी घसरण होत असताना भाजपा सरकार कोणतेच खरे आकडे जाहीर करत नाही. भाजपा सरकारमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना जी वस्तुस्थिती आहे, ती मांडली जात होती. रोजगार निर्मिती होत नसल्याने देशात प्रचंड बेरोजगारी आणि महागाई सुद्धा वाढलेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

इंडि आघाडी आजही मजबूत

दरम्यान, देशाची लोकशाही, संविधान आणि देशहित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडि आघाडीची स्थापना केली. ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असल्याने त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ इंडि आघाडी कमजोर झाली असे म्हणता येणार नाही, असेही पायलट यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

हेही वाचा – Congress News : “मी विजयी होईल असा पोलीस रिपोर्ट होता, पण…”, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराची न्यायालयात धाव


Edited By Rohit Patil