दुटप्पी भाजपला ओळखलेली जनता आमच्याबरोबर, सचिन सावंत यांची टीका

जनताच त्यांच्यासोबत नाही आहे. म्हणूनच भाजपमध्ये एकट्यानं आंदोलन करण्याची हिम्मत आणि क्षमता नाही

sachin sawant

ब्रिटिशांवरुद्ध केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून भाजपने पळ काढला होता. भाजप तेव्हाही प्रामाणिक नव्हता आणि आताही नाही अशी टीका काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपचा दुटप्पीपणा ओळखून असलेली जनता आज भाजपसोबत नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. भाजप जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते भाजपमध्ये एकट्याने आंदोलन करण्याची क्षमता नाही असा घणाघातही सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे. भाजपला केवळ राजकारण करायचं आहे असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपच्या दुटप्पीपणावर भाष्य करत निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हास्यास्पद तर आहेच परंतू अश्चर्यकारक निश्चित नाही. याचे कारण असे की सविनय नियमभंग ज्यावेळेला या देशामध्ये स्वतंत्रतापुर्व कालावधीमध्ये स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन होत होते त्यावेळेला यांनी पळ काढला होता. त्यामुळे भाजपकडे अनुभव नाही. ती क्षमता नाही. धैर्य नाही, त्या संदर्भातील साहस नाही आहे. ब्रिटिशांबरोबर त्या ठिकाणी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा पळ काढणारे ही लोक आता ते करु शकत नाहीत असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सचिन सावंत यांनी पुढे म्हटलं आहे की, यांची पत्रकार परिषद ऐकली होती त्यावेळेला म्हटलं होते की, जनता करेल आणि जनतेबरोबर भाजप राहील. आता जनताच त्यांच्यासोबत नाही आहे. म्हणूनच भाजपमध्ये एकट्यानं आंदोलन करण्याची हिम्मत आणि क्षमता नाही आहे. यामुळेच जनता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत तसेच महाविकास आघाडी सरकारसोबत आहे. कारण भाजपचा दुटप्पीपणा आणि ढोंग संपुर्णपणे जनतेला कळत आहे. एका ठिकाणी कावड यात्रा बंद करायची, उत्तर प्रदेशचे आणि उत्तराखंडचे सरकार कोरोनाची चिंता असल्यामुळे यात्र बंद करत असल्याचे सांगत आहे. मग महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये तुम्हाला चिंता नाही आहे का? असा सवालही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळेच ही केवळ दुटप्पी पणाची भूमिका असून भाजपला राजकारण करायचं असल्याचे लोकांना कळत आहे त्यामुळे जनता त्यांच्यासोबत नसल्याचेही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.