सत्तेच्या हव्यासापोटी मोदी सरकार किती लोकांचा बळी घेणार- सचिन सावंत

रेमडेसिवीरबाबतच्या निर्णयत मानवतेला काळीमा फासणारा

congress leader sachin sawat target on modi government
अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक! - सचिन सावंत

रेमडेसिवीरची निर्यात करणा-या कंपन्यांना मोदी सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करू नये असे आदेश देऊन, आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याच्या धमक्या दिल्याची माहिती महाराष्ट्र सरकारला मिळाली आहे. हे अत्यंत क्रूर आणि भयंकर असून मोदी सरकारचे हे पाऊल मानवतेला काळीमा फासणारे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी मोदी सरकार महाराष्ट्रातील किती लोकांचा बळी घेणार आहे? असा सवालही ट्विट करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारची बदनामी कशी होईल यासाठी केंद्रातील मंत्री ट्रोलच्या भूमिकेत शिरले आहेत. महाराष्ट्राला वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात केला जात नाही. यासोबतच लस आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यातही महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनही मिळू नये या म्हणून केंद्र सरकार रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांचे कान पिरगाळत असेल तर यापेक्षा अमानवीय कोणतेही सरकार असू शकत नाही, अशा शब्दात सावंत यांनी केंद्राचा समाचार घेतला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांना पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कळवण्यात आले. यातूनच हे आधुनिक निरो देश जळत असताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत अशीच नोंद इतिहास घेईल, असा टोलाही सावंत यांनी लगावला.केंद्र सरकार जर राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा होऊ देणार नसेल तर महाराष्ट्र सरकारने या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.