संतापजनक! भाजपाने वाटलेल्या तिरंग्यावर पक्षाचे नाव आणि चिन्ह, सचिन सावंतांनी ट्विट केला व्हिडीओ

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) हरघर तिरंगा (Har Ghar Tiranga) ही योजना राबवली जात आहे. त्यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरिकांना तिरंगा दिला जात आहे. मात्र, परभणीतून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. तिरंग्यावर भाजपचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.(Name and Symbol of BJP on natioanl Flag Tiranga)

हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियान; मंत्रालयात स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष

सचिन सांवत ट्विटमध्ये म्हणाले की, अतिशय संतापजनक… भाजपाचे कार्यकर्ते परभणीमध्ये भाजपाचे चिन्ह व पक्षाचे नाव असलेले राष्ट्रध्वज जनतेत वाटत होते. हा देशद्रोह नाही तर काय? राष्ट्रवादीचे आमदार सुरेश वर्पुडकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. भाजपाने जबाबदारी घेऊन देशाची माफी मागितली पाहिजे.


हे ट्विट करत सचिन सावंत यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेला तिरंगा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तिरंग्यातील हिरवा रंगही अर्धवट आहे. तसंच, वरच्या नारिंगी रंगावर भाजपाचं नाव आणि चिन्ह अर्धवट दिसत आहे. तसेच, लांबलचक कापड कापून त्याचे तिरंगा बनवला असल्याचं या व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे.

काय आहे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव?

यंदा आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे करणार आहोत. त्याकरता केंद्र सरकारकडून आझादी का अमृत महोत्सव हा राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच, या कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा ही मोहीमही राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक घरामध्ये २०*३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज प्रत्येकाने आपल्या घरावर लावायचा आहे. काही ठिकाणी पालिकेकडून हे ध्वज दिले जात आहेत. तर, काही ठिकाणी अल्पदरात २५ रुपयांत हे राष्ट्रध्वज मिळत आहे. अनेक पक्षांनीही स्थानिकांना राष्ट्रध्वज वाटले आहेत. मात्र, राजकीय पक्षांकडून वाटण्यात आलेले राष्ट्रीय ध्वज अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असून राष्ट्रध्वजाचे निकष पूर्ण होत नसल्याचं स्पष्ट होत आहे.