सचिन वाझे लादेन नाहीत, दोषींवर कारवाई करणारच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

police officer sachin vaze

मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. ‘आधी फाशी द्या आणि मग तपास करा,’ अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचे आणि त्याला आयुष्यातून उठवायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे, असे सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रे तयार केले जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरण ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे गाजलेल्या या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अधिवेशन घेणे कोरोनात आव्हानात्मक होते; पण नियम पाळून अधिवेशन घेतले. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केले. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणे न गाता ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपले ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कुणालाही पाठी घालणार नाही
कोणत्याही मृत्यू प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे हे सरकारचं काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. त्याचाही तपास सुरू आहे. परंतु, आधी फाशी द्या मग तपास करा, असे होत नाही. अशी पद्धत नसते. एखाद्याला टार्गेट करून त्याला आयुष्यातून उठवायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे. परंतु, डेलकर किंवा हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणारच. कुणालाही पाठी घालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मग पोलीस यंत्रणा रद्द करा
हिरने यांच्या मृत्यूची गांभीर्याने दखल घेतली आहे. सचिन वाझे जणू ओसामा बिन लादेनच आहेत, असे चित्रे कशासाठी निर्माण केले जात आहे. आम्ही कुणालाही दयामाया दाखवणार नाही. कोणीही असेल त्याला शिक्षा होणारच, असे सांगतानाच चौकशी करून फाशी द्या ही आपल्याकडची न्यायाची पद्धत आहे. फाशी देऊन न्याय करा अशी पद्धत नसते. त्यांनी जर पद्धत बदलली असेल तर त्यांनी सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा असते. एखादा गुन्हा किंवा घटना किंवा दुर्घटना घडली असेल त्याबाबत शंका असेल तर आपल्याकडे अनेक यंत्रणा आहेत. जर यांच्या यंत्रणा भारी असतील तर पोलीस यंत्रणा रद्द करायची का?, असा सवाल त्यांनी केला.

त्याला अटक केली म्हणून वाझेंना अडकवताय का?
यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून वाझेंना अडकवताय का?, असा सवालही त्यांनी केला.

वाझेंचा शिवसेनेशी संबंध नाही
वाझे पूर्वी शिवसेनेत होते. 2008 मध्ये ते सेनेत होते. त्यांनी पुन्हा सदस्यत्व घेतलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी काहीही थेट संबंध नाही. सर्व विषयात निष्पक्षपातीपणे पाहायचा चष्मा हवा. राज्य सरकारकडे जसे तारतम्य आहे, तसे विरोधकांनीही बाळगले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सीडीआर तपास यंत्रणेला द्या
सीडीआर कुणाकडे उपलब्ध होऊ शकतो का? त्यावर कारवाई करायची, नाही करायची यापेक्षा सीडीआर तपास यंत्रणेला द्या, त्यातील माहिती तपासू द्या. त्यावर पटकन भाष्य करणे योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नाणारमध्ये रिफायनरी नाहीच
नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे तिथे होणारा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. आता नाणार सोडून अन्यत्र रिफायनरी प्रकल्प होणार असेल आणि त्याला स्थानिकांचा विरोध नसेल तर मग आमची कोणतीच हरकत नाही. आम्ही प्रकल्पांच्या विरोधात कधीच नव्हतो; पण त्यासोबतच पर्यावरणाचाही विचार व्हावा या मताचा मी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

सचिन वाझेंची गुन्हे शाखेतून बदली

मनुसख हिरेन प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वाझे यांना मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मनसुख हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरू आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. एटीएस याबाबत कोणालाही पाठीशी घालणार नाही. सचिन वाझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.

मात्र, अनिल देशमुख यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार प्रविण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.