सदा सरवणकरांनी दोनदा गोळीबार केला, पोलिसांकडूनही दखल; अरविंद सावंतांचा दावा

मुंबई – शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केलाच होता. त्यांच्या गोळीबारात एक पोलीस अधिकारी बालंबाल बचावले. पोलिसांनीही गोळीबार झाला असल्याचं मान्य केलंय, असं शिवेसना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. पोलिसांनी शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान, पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत, तोवर इथून हलणार नाही, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला होता. त्यानंतर, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी गेल्या दोन दिवसांत काय काय झालं याची माहिती दिली.

हेही वाचा – तक्रार दाखल होत नाही तोवर हटणार नाही, अरविंद सावंतांचा दादर पोलीस ठाण्यात ठिय्या

“फेसबुक आणि इतर माध्यमातून अर्वाच्च शिव्या दिल्या. याची तक्रार देण्यासाठी महेश सावंत पोलीस ठाण्यात आले. पण शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी महेश सावंत यांना धमकी दिली. त्यानंतर सदा सरवणकर यांच्या वेपनमधून गोळीबार झाला. प्रभादेवीतही गोळीबार झाला आणि पोलीस ठाण्यातही गोळीबार झाला. याप्रकरणी महेश सावंत यांनी तक्रार दाखल करण्यासाठी आले असता त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. जबरी चोरीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. हा प्रकार फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण राज्यात होतोय,” असा आरोप अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. म्हणून आम्ही पोलीस ठाण्यात आलो. अंबादास दानवे, अनिल परब, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत आलो. ही जर गुंडागर्दी चालू राहिली, तर मग राज्य काय चाललंय? एका बाजूला गोळीबार केला जातो पण कारवाई होत नाही. सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करा, शिवसैनिकांवर दाखल केलेले 142,143,144,145,146,147,148,149,186,336 हे खोटे गुन्हे काढून घ्या, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरले, असा इशारा अरविंद सावंत यांनी केला.

हेही वाचा – सुसंस्कृत मतदारसंघात हाणा-माऱ्या करायला हे बिहार राज्य नाही, प्रभादेवी राडाप्रकरणी मनसेची टीका

“राज्यातील गृहमंत्री काय करतायत, मुख्यमंत्री यांचा इतिहास माहितच आहे. कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम राज्यकर्त्यांचं असतं. पण आज राज्यकर्तेच गुंडागर्दी करायला लागलेत. आमच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. पण त्यांना कधी अटक करतायत हे पाहायचं. आमच्या लोकांवरील ३९५ चा गुन्हा दाखल काढून घ्यायची आम्ही विनंती केली, ती विनंती मान्य करण्यात आलीय. इतका सगळा घाणेरडा प्रकार सुरू असताना देखील उद्धव ठाकरेंमुळे यांनी संयमाची भूमिका घेतली म्हणून राज्यात शांतता राहिली आहे. पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनीही स्टेटमेंट दिलं की गोळीबार झाला म्हणून. गुन्हा दाखल झालाय. पुढची कारवाई पोलिसांनी करायची आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? ठाकरे सरकारच्या काळात पोलिसांना मुभा होती. तेव्हाही यांच्यावर कारवाया झाल्या. ठाकरेंनी कधीच हस्तक्षेप केला नाही. सरकार बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे. आम्हालाही रस्त्यावर उतरता येतं, असा इशाराही अरविंद सावंत यांनी दिला आहे.

हेही वाचाबाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला रसद पुरवली? रोखठोकमधून शिंदे गटाला सवाल

…मग सदा सरवणकर का गोळीबार करतील?

प्रभादेवीतील राड्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकरांनी यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा पावसकर म्हणाले की, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव म्हणता आणि तुम्हीच हिंदुंच्या कार्यक्रमावर विरजण टाकण्याचा प्रयत्न करता. याला महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. मराठी, हिंदुंच्या सणांसाठी सदा सरवणकर आमदार म्हणून स्वत: सकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थित राहतात. त्यांची मिरवणुकीलाही उपस्थिती असते. ते लोकांची व्यवस्था करतात. कारण दादर-परळ-प्रभादेवी येथील सर्व सण आनंदाने साजरे केले जातात. त्यामुळे त्याच ठिकाणी व्यवस्था करणारा आमदार हा आपल्याच कार्यक्रमात फायरिंग कशी काय करु शकतो, असा सवाल पावसकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – …मग सदा सरवणकर का गोळीबार करतील?, किरण पावसकरांचा सवाल

काय आहे प्रकरण?

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारीच शिंदे गटानेही मंच उभारला होता. शिंदे गटातील लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. यातून शिंदे गटातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेनेतील माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद निर्माण झाले. शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढत गेला. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हा वाद इथेच शमेल असं वाटत असतानाच या वादाबाबत शिंदे गटातील संतोष तेलावणे यांनी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट लिहून अपशब्द वापरले. यावरून शिवसैनिक संतापले आणि त्यांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. यानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. तसेच, त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातला असल्याचं म्हटलं जातंय.

पोलिसांच्या कारवाईनंतर दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.  आमदार सदा सरवणकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. मात्र, सदा सरवणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान,  शिवसेना – शिंदे गटात मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. हे गुन्हा मागे घेण्यता येतील, असं पोलिसांनी अरविंद सावंतांना स्पष्ट केलं आहे.