मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीनंतर ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) विरोधात मोर्चा उघडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज शरद पवारांनी ईव्हीएमविरोधात ठराव घेण्याचे आवाहन केले. ईव्हीएम विरोधात पंतप्रधान, केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. पवारांच्या ईव्हीएमविरोधी भूमिकेवर सदाभाऊ खोत यांनी बोचरी टीका केली आहे. विधिमंडळात ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार हे लबाडांचे विद्यापीठ
सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवार हे लबाडांचे विद्यापीठ आहे. तिथे शिक्षण घेण्याची गरज नाही, फक्त फेक डिग्री घ्यायची असते. गेली ५०-६० वर्षे त्यांनी लोकांच्या भावना भडकवणे आणि फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचेच काम केले आहे. गेली १०-१५ वर्षे तुम्ही निवडणुका जिंकल्या, तेव्हा ईव्हीएम चांगले होते. आता दुसरी लोकं जिंकायला लागली की, तुमच्या पोटात कळा सुटायला लागल्या. त्यांचा हा डाव महाराष्ट्रातील जनता उलथवून लावेल असंही खोत म्हणाले.
राहुल गांधीवरही निशाणा
सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. देशात कॉम्प्यूटर, तंत्रज्ञान आणण्याचे काम त्यांनी केले. आता त्यांचाच मुलगा तंत्रज्ञानाच्या विरोधात आवाज उठवत आहे. ईव्हीएमला विरोध करत आहे, हे देश आणि महाराष्ट्र पाहात असल्याचे खोत म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मारकडवाडी येथील गावकऱ्यांशी संवाद साधला. या गावाने ईव्हीएमच्या निकालाला नकार देत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली होती. स्वखर्चाने येथील गावकरी बॅलेट पेपेरवर मतदान घेणार होते. प्रशानाकडून त्यासाठी सहकार्याची अपेक्षा त्यांनी केली होती. मात्र पोलिसांनी या गावात जमावबंदी लागू केली. ईव्हीएमविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे आज येथे शरद पवारांनी भेट दिली.
शरद पवारांनी गावकऱ्यांना ईव्हीएमविरोधात ठराव घेण्याचे आवाहन केले. तुमचे गाऱ्हाणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत घेऊन जाण्याचा विश्वास त्यांनी दिला. ईव्हीएमला लोकांचा विरोध असेल तर सरकारने ते नाकारले पाहिजे आणि जुन्या पद्धतीने निवडणूक घेतली पाहिजे, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा : Jayant Patil : लोकांची मागणी आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बॅलेटवर घ्या; EVMला विरोध वाढला
Edited by – Unmesh Khandale