विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार, काँग्रेस आणि भाजपात होणार लढत

अर्ज मागे घेण्यासाठी अवघी ५ मिनीटे शिल्लक असताना सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

vidhan bhavan

विधानपरिषद निवडणुकीसाठी (maharashtra legislative Assembly election) सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला डमी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार (candidates) रिंगणात आहेत.

अर्ज मागे घेण्यासाठी अवघी ५ मिनिटे शिल्लक असताना सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. खोत यांनी माघार घेतल्याने आता भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे ५  उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील.

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकात हंडोरे तर शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर हे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार आहेत. संख्याबळानुसार, भाजपचे ४, राष्ट्रवादीचे २, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा दुसरा उमेदवार आणि भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यात लढत होईल. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत.

विधानसभेत भाजपचे  १०६ संख्याबळ आहे. तर काही अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत आहेत. त्यानुसार भाजपचे ४ उमेदवार सहज निवडून येतील. मात्र, पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची व्यवस्था भाजपला करावी लागणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा अधिक मतांची गरज आहे. यामध्ये एवढ्या मतांची जुळवाजुळव करणे हे मोठे आव्हान भाजपपुढे पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आहे.

काँग्रेसचे विधासनभेतील संख्याबळ ४४ आहे. त्यानुसार २७ मते मिळवून काँग्रेसचा १ उमेदवार सहज निवडून येईल. त्यानंतर काँग्रेसकडे १७ मते अतिरिक्त आहेत. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसला आणखी १० मतांची गरज असेल.