शरद पवारांच्या पत्राची घेतली दखल, रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राची दखल घेत केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांचा फोन

sadananda gowda react on Sharad Pawar's letter, promising to reconsider the price hike of chemical fertilizers
शरद पवारांच्या पत्राची घेतली दखल, रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन

रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावे, केंद्रीय खत व रसायन मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घ्यावी अशी विनंती राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे केली होती. शरद पवार यांच्या पत्राची दखल केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी घेतली आहे. वाढत्या खतांच्या दरांवर पुनर्विचार करण्यात येईल असे आश्वासन सदानंद गौडा यांनी दिले आहे. शरद पवार यांनी मंगळवारी पत्र लिहिले होते यानंतर गौडा यांनी गुरुवारी शरद पवार यांना फोन करुन खतांच्या दरवाढीवर सविस्तर चर्चा केली आहे.

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढत आहेत. यामुळे खतांच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिले होते. या पत्रात शरद पवारांनी म्हटले आहे की, कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळेअधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खतांच्या वाढीव किंमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत. खतांच्या दर आटोक्यात आणा अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. यावर सदानंद गौडा यांनी पुनर्विचार करु असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राची दखल घेत केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी शरद पवारांना फोन केला होता. फोनवर दरवाढीवर सविस्तर चर्च करुन खतांच्या किंमतीवर पुनर्विचार करु असे आश्वासन दिले आहे.

शरद पवारांनी पत्रात काय म्हटलंय

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, देशातील नागरिक अधिच कोरोना परिस्थितीमुळे त्रासलेला आहे. नागरिकांना मदत करण्याऐवजी केंद्र सरकार खतांच्या किंमती वाढवत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. खतांच्या किंमती वाढल्या असल्यामुळे पेरणीपुर्वी होणाऱ्या शेतीविषयक कामकाजावर थेट परिणाम होईल यानंतर भविष्यात पिकांच्या उत्पादन खर्चावरही परिणाम होईल. त्यामुळे खतांच्या वाढीव किंमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसून किंमत कमी करावी अशी मागणी शरद पवार यांनी आपल्या पत्रात केली होती.

शेतकऱ्यांना जुन्याच भावाने खत उपलब्ध होणार

चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रासायनिक खतांसाठी आणखी १४,७७५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी १४० टक्के वाढली असून आता शेतकऱ्यांना डीएपी खताची गोणी गेल्या वर्षीच्याच म्हणजे १२०० रुपये भावाने मिळेल. नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याच पद्धतीने आजचा स्वागतार्ह निर्णय आहे.

ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतासाठी लागणाऱ्या फॉस्फरिक ॲसिड, अमोनिया या रसायनांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे खत कंपन्यांनी भारतात रासायनिक खताच्या किंमतीत वाढ केली. परंतु, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हा खताच्या किंमतीचा वाढीव बोजा झेपणारा नव्हता. खतांच्या किंमती परवडण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने अनुदान द्यावे, अशी विनंती आपण कालच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायनेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर आजचा झालेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. सरकारने वाढीव किंमतीचा बोजा स्वतःवर घेतला आहे.