साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी दिले संमेलन आयोजकांना व्याकरणाचे धडे!

Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan

मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक म्हटले की, ते साहित्य क्षेत्रातील प्रकांड पंडित असावेत असा समज असतो. परंतु नाशिक याला अपवाद ठरते की काय अशी शंका येत आहे. कारण नाशिकमध्ये होणार्‍या संमेलनाचे आयोजक जेव्हा कच्ची रुपरेषा घेऊन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे गेले, तेव्हा त्यातील अशुद्ध लेखन बघून अध्यक्षांचा पारा चढला. त्यांनी त्यातील एक-एक चुका काढत आयोजकांचे कान उपटले. अध्यक्षांनीच याबाबत ‘आपलं महानगर’शी बोलताना माहिती दिली.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अवघे १५ दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी साहित्य महामंडळ अध्यक्षांना कार्यक्रमपत्रिका दाखवली, परंतु घडले भलतेच. परिपूर्ण कार्यक्रमपत्रिका आयोजक घेऊन येतील असे महामंडळाच्या अध्यक्षांना वाटले. मात्र, कार्यक्रमपत्रिका व्याकरणदृष्ठ्या अशुद्ध असल्याने नाशिकमध्येच अनुभवी मुद्रितशोधकाकडून संबंधीत कार्यक्रमपत्रिका अंतिम करावी, असे अध्यक्षांकडून सांगण्यात आले. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका अंतिम करण्यासाठी संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर आणि प्रा. शंकर बोर्‍हाडे हे औरंगाबाद येथे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याकडे बुधवारी (दि.१७) गेले होते. परिपूर्ण कार्यक्रमपत्रिका न आणल्याने आणि सांगितलेली नावे परिसंवाद व कवीकट्ट्यामध्ये नसल्याने ठाले-पाटील यांनी कानउपटणी केली. कार्यक्रमपत्रिकेत कोणतीही नावे सुटू देऊ नका, असेही ठाले-पाटील यांनी सांगितले.

आयोजकांनी दिलेली कार्यक्रम पत्रिका अशुद्ध होती. शुद्धलेखन तपासत दुरुस्ती करुन दिली. परिसंवादासाठी अध्यक्षांची नावे होती, मात्र इतर ५ नावे नव्हती. परिपूर्ण कार्यक्रमपत्रिका करुन नाशिकमध्ये अनुभवी मुद्रितशोधकाकडून ती अंतिम करण्याबाबत आयोजकांना सांगितले आहे.

– कौतिकराव ठाले-पाटील,
अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ