मुंबई – अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चोरट्याने सहा वार केले होते. एवढचं नाही तर चाकूचा तुकडा त्याच्या पाठीत घुसला होता. ऑपरेशन करुन चाकूचा तुकडा काढण्यात आला. यानंतर अवघ्या सहा दिवसांत सैफ अली खान बरा होऊन घरी परतला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली आहे, त्याच्यावर चाकूने वार झाले होते, असे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून त्याच्या उपचाराबद्दल शंका उपस्थित केली होती. यावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनीही शंका उपस्थित केली. आता भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री यांनीही शंका उपस्थित केली आहे. भाजप नेत्यांनी सैफ अली खान सहा दिवसांत रुग्णालयातून घरी आल्यामुळे त्याच्यावरील उपचार लवकर संपल्यामुळे संशय व्यक्त केला होता. यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सैफ अली खानवर डॉक्टरांनी केलेल्या उपचारांवर संशय घेऊ नये. मात्र इतर नेत्यांनी उपस्थित केलेल्या संशयाला वाव असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरुन आणि लवकर उपचार संपल्यावरुन वादाला तोंड फुटले आहे.
नितेश राणेंचा आरोपीवर निशाणा, सैफ अली खानबद्दल म्हणाले…
राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, मुंबईमध्ये काय सुरु आहे. त्या सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला झाला. बांगलादेशी हल्लेखोराने हा हल्ला केला. पहिले फक्त नाक्यावर उभे राहत होते. आता घरात घुसायला लागले आहेत असा निशाणा त्यांनी बांगलादेशी आरोपीवर लगावला. तर सैफ अली खानवर बोलताना ते म्हणाले की, तो असा रुग्णालयातून चालत आला, मलाच संशय आला. ह्याला काय खरंच चाकू मारला आहे की असंच एक्टिंग करुन बाहेर निघाला आहे. टुणटुण करुन नाचत आहे तो, अशा शब्दांत नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला आहे.
संजय राऊत, संजय निरुपम यांच्याकडूनही शंका उपस्थित
दवाखान्यातून सुटी मिळालेल्या सैफची चाल आणि फिटनेस पाहून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी ज्याच्यावर हल्ला झाला ती हीच व्यक्ती आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे माजी खासदार संजय निरुपम यांनी सैफ अली खानची चाल, हातवारे आणि एकंदर दवाखान्यातून सुटून आलेला सैफ हा एका मोठ्या ऑपरेशननंतर बाहेर पडला, असे वाटत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सहा दिवसांत चाकू हल्ल्यातील जखमी सैफला बरे केले हा लीलावतीतील डॉक्टरांचा चमत्कार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर संजय निरुपम यांनी स्वतः सैफ, त्याचे कुटुंबिय किंवा डॉक्टरांनी तो एवढ्या लवकर बरा कसा झाला हे सांगावे असे म्हटले आहे.
हेही वाचा : Saif Ali Khan : सैफ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; मोहम्मद शहजाद अन् सीसीटीव्हीतील आरोपीचा चेहरा जुळेना