ठाणे : प्रेम भंग झाल्यामुळे हल्ली अनेक महिला किंवा तरुणी या स्वतःच्या जिवनाचा शेवट करतात. तर काही प्रेम मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. पण खूप कमी महिला अशा असतात ज्या कायद्याच्या पद्धतीने आपले प्रेम मिळवितात. ठाण्यात देखील एक असेच प्रेम प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यामध्ये पीडित महिलेने सखी वन स्टॉप आणि महिला आयोगाच्या मदतीने आपले प्रेम मिळविले आहे. तसेच सखी वन स्टॉप आणि महिला आयोगाने देखील या महिलेला न्याय मिळवून देत ती प्रेम करत असलेल्या तरुणाशी तिचा विवाह लावून दिला आहे. (Sakhi One Stop and Women’s Commission got justice for the woman)
हेही वाचा – आधीच Wrong Side चालवत होती गाडी; महिलांनी अडवले तर थेट हाणामारीवरच उठली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेचे एका पुरुषाशी प्रेम संबंध जुळले. ज्यानंतर या महिलेच्या खऱ्या प्रेमाचा फायदा घेत या पुरुषाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. परंतु त्यानंतर ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्याच्यावर प्रेम असल्याने त्या महिलेने देखील तो सांगत गेला तसे तिने केले. परंतु काही काळानंतर पीडित महिलेने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला, परंतु मी सरकारी कर्मचारी आहे. घरच्यांनी हुंडा घेवून लग्न जमवले आहे. मला त्यांचे ऐकावेच लागेल, असे सांगत तो महिलेला लग्नाला नकार देऊ लागला.
या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या पीडितेला तिची फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. ज्यानंतर तिने महिला आयोगाकडे धाव घेतली. तिने तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत महिला आयोगाला सांगितली. ज्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटरची मदत घेतली. परंतु महिला आयोगाचे दरवाजे ठोठावण्याआधी पीडितेने पोलिसांकडे देखील मदत मागितली होती. पोलिसांनी महिलेला त्या पुरुषावर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. पण पीडितेचे त्या पुरुषावर जिवापाड प्रेम असल्याने तिने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला.
परंतु, त्या पुरुषाकडून झालेल्या त्रासामुळे सदर पीडित महिला मानसिकरित्या खचली होती. ज्यानंतर हे प्रकरण सखी वन स्टॉपकडे वर्ग होताच त्यांनी या पीडित महिलेला मानसिक आधार देत तिचे आणि सदर पुरुषाचे समुपदेशन केले. यानंतरही सदर व्यक्ती तयार होत नसल्याने अखेरीस पीडितेला पुरुषाविरोधात तक्रार करण्यास भाग पाडण्यात आले. ज्यानंतर पोलिसांच्या मदतीने या पुरुषाला त्याच्या घरच्यांनी ठरवलेले लग्न मोडण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर त्यांच्या मंदिरातील लग्नानंतर काही दिवसांपूर्वी यांचे नोंदणी पद्धतीने लग्न लावून देण्यात आले आहे.
दोघांचा विवाह नोंदणी पद्धतीने करून देण्यात आला आहे. असे असले तरी या प्रकरणात पुढील सहा महिने सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक कविता थोरात यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्रासात असलेल्या महिलेला महिला आयोग आणि सखी वन स्टॉपच्या मदतीने न्याय तर मिळालाच पण त्यासोबतच ती ज्याच्यावर जिवापाड प्रेम करत होती, तो व्यक्तीही तिला मिळाला आहे.