Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र साकीनाका प्रकरण: अ‍ॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल; कुटुंबियांना २० लाखांची आर्थिक मदत

साकीनाका प्रकरण: अ‍ॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल; कुटुंबियांना २० लाखांची आर्थिक मदत

पंधरा दिवसांत तपास पूर्ण करून महिन्याभरात आरोपपत्र सादर करणार. घटनेचे नाट्यरूपांतर करणार, तर गुन्ह्यांतील हत्यार पोलिसांकडून हस्तगत

Related Story

- Advertisement -

साकीनाका येथे झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात पंधरा दिवसांत एसआयटी आपला तपास पूर्ण करणार असून येत्या महिन्याभरात आरोपीविरुद्ध भक्कम आरोपपत्र विशेष कोर्टात सादर केले जाणार आहे. पीडित महिला एका विशिष्ट समाजाची असल्याने या गुन्ह्यांत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल करताना गुन्ह्यांतील हत्यार पोलिसांना सादर केले आहे. तिच्या कुटुंबियांना वीस लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा झाली असून ही मदत तिच्या मुलींना टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. या संपूर्ण घटनेचे पोलिसांकडून नाट्यरूपांतर होणार असून पोलिसांच्या वतीने प्रसिद्ध क्रिमीनल वकील राजा ठाकरे हे कोर्टात बाजू मांडतील, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तीन दिवसांपूर्वी साकिनाका येथे एका 32 वर्षांच्या महिलेवर तिच्याच परिचित व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला होता. तिला अमानुष मारहाण करून तिच्या गुप्तागांवर कुठल्या तरी घातक हत्याराने दुखापत झाली होती. त्यात ती महिला गंभीररीत्या जखमी झाली होती. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी साकिनाका पोलिसांत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या मोहन चौहाण या मुख्य आरोपीस काही तासांत पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. याच संदर्भात येणार्‍या उलटसुलट बातम्यांमुळे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासाबाबत पत्रकारांना माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी हेमंत नगराळे यांनी सांगितले की, पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांत आता एसआयटीने अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढविले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या मोहनने त्याच्या गुन्ह्यांची पोलिसांना कबुली दिली आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांकडून गुन्ह्यांचे नाट्यरूपांतर केले जाणार आहे. ही महिला कधी आली, आरोपी कधी आला, ते दोघेही घटनास्थळावर कसे आणि कधी आले. तिथेच नक्की काय झाले होते. गुन्ह्यानंतर आरोपी कधी निघून गेला आणि त्यानंतर संपूर्ण तपशीलाची माहिती घेतली जाणार आहे. या घटनेची व्हिडिओ शूटिंग केली जाणार असून हा पोलिसांसाठी एक महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

या गुन्ह्यांत सरकारी वकील म्हणून राजा ठाकरे यांची नियुक्ती केली गेली आहे. राजा ठाकरे हे नावाजलेले क्रिमीनल वकील असून त्यांचा तपासकामी नक्कीच पोलिसांना मदत होणार आहे. या गुन्ह्यांचा तपास पंधरा दिवसांत पूर्ण केला जाणार असून एका महिन्यांत विशेष कोर्टात आरोपपत्र सादर केले जाणार आहे. आरोपपत्रात आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे सादर केले जाणार आहेत. डीएनए रिपोर्ट लवकरच मिळावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत. रविवारी राष्ट्रीय महिला आयोगासह राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळासह पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. तपास अधिकार्‍यांकडे तपासाची माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

पोलीस महासंचालकांसह मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून आरोपपत्र सादर करणे, त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर एक बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महिला बाल कल्याण विभागाचे सचिव आय. एस कुंदन, सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत पीडित महिलेच्या मुलींसाठी वीस लाख रुपयांची आर्थिक शासकीय मदत जाहीर करण्यात आली. ही मदत या मुलींना टप्प्याटप्प्यने दिली जाणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी बोलताना सांगितले.

दरम्यान पिडीत महिला आणि आरोपी मोहन चौहाण हे एकमेकांच्या परिचित होते. त्यांची यापूर्वीही चार ते पाच वेळा भेट झाली होती. त्यांच्यात व्यवहार झाला असून याच व्यवहारातून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होते. पिडीत महिलेकडून त्याच्याकडे मागणी होत होती. या वादातून त्याने तिला अमानुषपणे मारहाण केली होती. त्यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यांच्यात काय व्यवहार झाला आणि ती काय मागणी करीत होती हा तपासाचा भाग आहे, त्यामुळे आतातरी याविषयी काहीही सांगता येणार नाही असे हेमंत नगराळे यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात पिडीत महिलेच्या शरीरात अंतर्गत भागात गंभीर दुखापत झाली आहे. साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी साडेबारा वाजता भेट दिल्याची नोंद आहे. त्यामुळे पोलीस तिथे गस्त घालत नव्हते हे म्हणणे चुकीचे आहे. गेल्या पाच वर्षांत महिलांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांची नोंद आणि गुन्हे उघडकीस आलेल्या टक्क्यावारीची माहिती देताना पोलीस आयुक्तांनी सांगितले की, २०१६ साली विविध ५१७७ गुन्ह्यांची नोंद करताना पोलिसांनी ७२ टक्के गुन्ह उघडकीस आणले. २०१७ साली ५४२७ नोंद झाली तर ८० टक्के, २०१८ साली ५९७८ गुन्ह्यांची नोंद होऊन ८१ टक्के, २०१९ साली ६४३८ गुन्ह्यांची नोंद होऊन ८३ टक्के, २०२० साली ४५३९ गुन्ह्यांची नोंद करुन ७७ टक्के तर ऑगस्ट २०२१ पर्यंत ३५१५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात ७४ टक्के गुन्ह्यांची उकल करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

 

- Advertisement -