घरमहाराष्ट्रहा 'स्नेह' इतरवेळी कुठे अदृश्य होतो? वानखेडेवरील सर्वपक्षीय स्नेहभोजनावर शिवसेनेचा हल्लाबोल

हा ‘स्नेह’ इतरवेळी कुठे अदृश्य होतो? वानखेडेवरील सर्वपक्षीय स्नेहभोजनावर शिवसेनेचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई – ‘महाराष्ट्रातील दिवाळी शेतकऱयांसाठी बरी नाही. सर्वत्र महाप्रलय आहे आणि शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाहून गेली. शेतकरी अडचणीत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होईल. पण आपले सर्वपक्षीय शेतकरी राजकारणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले व त्यांनी वानखेडे मैदानावर स्नेहभोजन केले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि शिवसेनेचे लोकही त्यात सामील झाले. हा ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो?’ असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून रोखठोकद्वारे विचारण्यात आला आहे.

हेही वाचा – स्नेहभोजनासाठी शिंदे, फडणवीस, पवार एकत्र येणार; डिनर डिप्लोमसी कशासाठी?

- Advertisement -

शिंदे यांचा रामदास आठवले होईल

‘मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘शिंदे यांचा रामदास आठवले होईल.” हे विधान बोलके आहे,’ असं या रोखठोकमध्ये लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कुठेच दिसत नाहीत

‘मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात शिंदे यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत,’ असंही रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

शिवसेनेला गुंतवून ठेवले

‘मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व शिंदे गट करतो. ठाण्यातील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले व ठाणे महानगरपालिकेने शिंदे गटाने सर्वप्रथम परवानगी मागितली या सबबीखाली खासदार राजन विचारे यांना परवानगी नाकारली. पण दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्क मैदानासाठी हा नियम पाळला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे,’ अशी टीका शिवसेनेने केली आहे.

राज्यपाल कुठे आहेत?

‘शिवाजी महाराजांपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत वादग्रस्त विधान करून ते खळबळ माजवीत होते. ते आपले कार्यक्षम राज्यपाल आज कोठे आहेत? त्यांचे ज्ञान, अनुभव यांचे मार्गदर्शन शिंदे, फडणवीसांच्या सरकारला होऊ नये याचे आश्चर्यच वाटते. सत्य असे आहे की, राजभवनाने आता लुडबुड करू नये, निवृत्तीबुवांसारखे राहावे हा राजकीय आदेश राज्यपाल महोदय पाळीत आहेत. राज्यपालांकडे खरोखरच काही काम उरले नसेल तर मुंबईतील भाजप नेत्यांच्या ‘डॉक्टरेट’ पदव्यांच्या चौकशींचे आदेश तरी त्यांनी द्यावेत,’ असा उपहासात्मक टोला लगावण्यात आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -