सांगली : कायमच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा विषय आला की सर्वांच्याच भुवया उंचावतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज (ता. 15 ऑगस्ट)संभाजी भिडे आणि त्यांचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्यावतीने सांगलीत पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेतून करण्यात आलेल्या मागणीमुळे भिडे पुन्हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. भारत हे हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे राष्ट्रध्वज ध्वज भगवा करावा, अशी मागणी यावेळी शिवप्रतिष्ठानकडून करण्यात आलेली आहे. (Sambhaji Bhide’s demand to make India’s national flag saffron)
हेही वाचा – घोषणा प्रकाश आंबेडकरांची, समीकरणे बदलणार मविआची पण भाजपाच्या हाती हुकूमाचा पत्ता
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संभाजी भिडे यांच्या नेतृत्वात सांगलीमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. पदयात्रेमध्ये संभाजी भिडे यांच्यासह हजारो धारकरी सहभागी झाले होते. तर, यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी संभाजी भिडे यांच्या भोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, भगव्या ध्वजाला हार प्रदान करून प्रेरणा मंत्राने या पदयात्रेला सुरुवात झाली.
ही पदयात्रा शिवाजी मंडई, मारुती चौक, हरभट रोड, कापड पेठ मार्गे राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन थांबली. “भगवा न राष्ट्रध्वज हे उरी शल्य दु:ख, करणार राष्ट्रध्वज ही शिव आनभाक, दिल्लीवरी फडकवू भगव्या ध्वजाला, ओलांडू म्लेंच्छ वधन्या आम्ही अटकेला…” असे या पदयात्रेचा महत्त्वाचा उद्देश होता. परंतु या पदयात्रेला मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. पण पोलिसांनी अनेक अटी आणि शर्थींसह या पदयात्रेला मान्यता दिली.
काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी विविध संघटनांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.