काँग्रेसची ‘शिवसेना स्टाईल’!

खरंतर, बाळासाहेब थोरातांचा असा आक्रमक विरोध पाहिला की भाजप-शिवसेनेची सत्ता असताना शिवसेना ज्या पद्धतीने विरोध करत होती, त्याची आठवण होते. तेव्हाही शिवसेना सत्तेत असलो, तरी जनतेच्या भल्याची आणि विकासाची भूमिका मांडत असल्याचं सांगून आपल्याच सरकारवर टीका करत होती. आता शिवसेनेलाच काँग्रेसच्या रुपानं त्यांच्याच भूमिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही ‘शिवसेना स्टाईल’ आता शिवसेनेचं नेतृत्व कसं हाताळतं, यावर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं म्हणायला हरकत नाही!

‘आम्ही ठणकावून सांगतो’…‘भान बाळगावे’…‘आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही’…‘कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही’… काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याच मित्रपक्षाला सुनावलेले हे खडे बोल! खरंतर हे किंवा अशा प्रकारचे आक्रमक शब्द कायम शिवसेना नेत्यांच्या, पदाधिकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या बोलण्यात ऐकण्याची महाराष्ट्राच्या जनतेला सवय लागली आहे. त्यानंतर हा वसा कौटुंबिक वारशामधून राज ठाकरेंकडेही आला. त्यामुळे त्यांच्याही भाषणांमध्ये अशा प्रकारचा आक्रमकपण दिसू लागला. पण महाराष्ट्र काँग्रेसकडून गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारचा आक्रमकपणा दाखवल्याचं दिसत नव्हतं. विरोधकांना ‘ठणकावून’ सांगण्याच्या भानगडीत काँग्रेसजन फारसे पडत नसत. त्यापेक्षा रीतसर निषेध करण्यावरच त्यांचा भर असे. पण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसकडून ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागली आहे, आणि विशेष म्हणजे आपल्याच सत्तेतल्या मित्रपक्षाविरूद्ध ही आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागल्यामुळे हा माध्यमांसाठी चर्चेचा, सत्ताधार्‍यांसाठी चिंतेचा आणि भाजपसाठी राजकारणाचा विषय झाला आहे.

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं, असा अट्टाहास शिवसेनेनं लावून धरला आहे. नव्हे, सुरुवातीपासूनच शिवसेनेची तीच भूमिका राहिली आहे. अगदी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याआधीपासून. त्यामुळे काँग्रेसला शिवसेनेची ही भूमिका माहिती नसण्याचं काहीही कारण नाही. शिवाय इतकी वर्षे औरंगाबादमध्ये याच मुद्यावरून राजकारण पेटवणार्‍या शिवसेनेसमोर काँग्रेसनंही दोन हात केलेच आहेत. त्यामुळे आत्ताच हा मुद्दा का पेटवला जातोय? यासोबतच काँग्रेसकडून आत्ताच या मुद्याचं राजकारण का केलं जातंय? हा देखील मुद्दा चर्चेचा ठरू लागला आहे. विशेषत: बाळासाहेब थोरात यांच्याकडून या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली जाऊ लागली आहे. कधी ट्वीटरच्या माध्यमातून तर कधी थेट प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेला विरोध करण्यात बाळासाहेब थोरात अजिबात मागे हटत नाहीत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिले ६ ते ७ महिने शिवसेनेसोबत शांततेत संसार करणार्‍या काँग्रेसनं पहिला आरोप केला तो काँग्रेसला सत्तेत समान स्थान आणि निर्णय प्रक्रियेत योग्य महत्त्व मिळत नसल्याचा. तेव्हा देखील बाळासाहेब थोरातांनी थेट प्रसार माध्यमांमध्येच हे आरोप करून मुख्यमंत्री आणि सत्ताधार्‍यांना अडचणीत आणलं होतं. हे प्रकरण तर थेट दिल्ली हायकमांडपर्यंत देखील पोहोचलं होतं. आता पुन्हा एकदा काँग्रेसनं शिवसेनेच्या विरुद्ध भूमिका घेतली असून यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचीदेखील साथ आहे!

बाळासाहेब थोरातांनी यावेळी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून खुलं पत्रच त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये भाजपला कानपिचक्या देताना त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. ‘केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणार्‍यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही’, अशा शब्दात बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेला सुनावलं आहे.

बाळासाहेब थोरातांनी लिहिलेलं हे खुलं पत्र काही क्षणांसाठी कुणाला ‘सामना’चा अग्रलेख वाटल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही! कारण यातली भाषा ही काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या राजकीय पद्धतीला साधर्म्य सांगणारी वाटत नाही. पण मग काँग्रेस आत्ताच इतकी आक्रमक का झालीये? की औरंगाबाद पालिका निवडणुका आणि मुंबई पालिकेसोबतच राज्यातील इतर पालिका निवडणुकांमध्ये आपलं वजन आणि व्होटबँक वाढवण्यासाठी काँग्रेसकडून अशा प्रकारे विरोध केला जातोय? या प्रश्नावर व्यापक चर्चा होऊ शकते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे एखाद्या शहराचं नाव धार्मिक किंवा ऐतिहासिक संदर्भातले दाखले देऊन बदलणं हे काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर सर्वच प्रकारच्या मतदारांशी जुळवून घेताना परवडणार नाही. विशेषत: भाजपच्या विरोधात काँग्रेसला आपला ‘धर्मनिरपेक्ष’ चेहरा जपणं नितांत आवश्यक आहे. अशात काँग्रेसनं या मुद्याला विरोध करणं साहजिक वाटू शकतं. पण त्याचसोबत अशा मुद्यांमुळे सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत ताणतणाव निर्माण होऊ देणं देखील काँग्रेसला नक्कीच परवडणारं नाही. कारण सत्तेत सहभागी असल्यामुळेच काँग्रेसला राज्यात पुन्हा हातपाय पसरण्याची आणि पक्ष वाढवण्याची चांगली संधी मिळू शकणार आहे. हे काँग्रेसच्या धुरिणांना माहिती नसावं, असं अजिबात वाटण्याचं कारण नाही.

बाळासाहेब थोरात गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेविरोधात जाहीर भूमिका घेऊन आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची निवडणूक देखील कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काँग्रेसला राज्यामध्ये आता आक्रमक चेहरा हवा आहे. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील निवड होताच ‘२०२२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार’ असल्याची घोषणा करून टाकली आहे. त्यामुळे राज्यात आक्रमकपणे पक्षवाढ करण्यासाठी काँग्रेसकडून पावलं टाकली जात आहेत हे स्पष्ट आहे. आणि त्यात चुकीचंही काही नाही. कारण आघाडीत असला, तरी प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याचा नक्कीच अधिकार आहे. मात्र, आपण घेतलेली भूमिका आपल्यालाच मारक ठरणार तर नाही ना, याचा देखील काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वानं विचार करणं आवश्यक आहे. बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातला काँग्रेसचा आक्रमक चेहरा होण्याचा प्रयत्न करत असले, तरी यातून हातची सत्ता गेली, तर त्याचे राजकीय परिणाम काँग्रेसला भोगावे लागू शकतात. विशेषत: राज्यात काँग्रेसचे इतरही अनेक आक्रमक नेते असताना या मुद्यावरून फक्त थोरातच अशा प्रकारे आक्रमक झालेले दिसणं नक्कीच खटकणारं आहे!

खरंतर औरंगाबादचा विकास हा विषय कुणीही नाकारू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये औरंगाबादकरांनी सर्वच पक्षांना सत्ता देऊन पाहिली आहे. आणि त्या सर्वांनी त्यांचा भ्रमनिरासच केला आहे. सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी औरंगाबादमधून निवडून विधिमंडळावर आणि देशाच्या संसदेतदेखील गेले आहेत. मात्र, तरीदेखील औरंगाबादकरांना मात्र अपेक्षित विकासानं हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी केलेली औरंगाबादच्या विकासाची मागणी योग्यच आहे. पण त्यासाठी नामांतराला विरोध करणं तर्काला पटत नाही. खरंतर इथे थोरातांनी काँग्रेसच्या देशपातळीवरच्या प्रतिमेला आणि विचारसरणीला ते पटत नाही म्हणून विरोध करतोय, इतकंच सांगितलं असतं, तरी चाललं असतं. पण त्याहीपुढे जाऊन त्यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी औरंगाबादमध्ये विकास होत नसताना नाव बदलण्याऐवजी विकासावर लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला दिला. आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं तर तिथे विकासच होणार नाही का? असा प्रश्न कुणी बाळासाहेबांना विचारला, तर त्याचं त्यांच्याकडे काय उत्तर असेल?

खरंतर, बाळासाहेब थोरातांचा असा आक्रमक विरोध पाहिला की भाजप-शिवसेनेची सत्ता असताना शिवसेना ज्या पद्धतीने विरोध करत होती, त्याची आठवण होते. खुद्द विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे राज्यात युतीचं सरकार असताना प्रत्यक्ष किंवा सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर आणि भाजपच्या निर्णयांवर थेट प्रहार करताना दिसत होते. तेव्हाही शिवसेना सत्तेत असली, तरी जनतेच्या भल्याची आणि विकासाची भूमिका मांडत असल्याचं सांगून आपल्याच सरकारवर टीका करत होती. आता शिवसेनेलाच काँग्रेसच्या रुपानं त्यांच्याच भूमिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही ‘शिवसेना स्टाईल’ आता शिवसेनेचं नेतृत्व कसं हाताळतं, यावर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं म्हणायला हरकत नाही!