Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र भाजपवर संभाजीराजे नाराज; आरक्षणप्रश्नी भूमिकेवर पक्षाकडून संशय घेतल्याने वेगळ्या वाटेवर

भाजपवर संभाजीराजे नाराज; आरक्षणप्रश्नी भूमिकेवर पक्षाकडून संशय घेतल्याने वेगळ्या वाटेवर

खासदार संभाजीराजेंना २००९ ला राष्ट्रवादीने कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी दिली. पराभवानंतर ते पक्षापासून दुरावले. त्याचाच फायदा घेत भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी देत केवळ महाराष्ट्रात पक्षाला बहुजन चेहरा देण्याचा प्रयत्न केला.

Related Story

- Advertisement -

खासदार छत्रपती संभाजीराजे भाजपवर नाराज झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी आपल्या आक्रमक भूमिकेवरच संशय व्यक्त केल्यामुळे संभाजीराजे भविष्यात वेगळा विचार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच संभाजीराजे यांनी बेदखल केले असून या सर्व पार्श्वभूमीवर ते नवीन पक्षाची स्थापना करणार की महाविकास आघाडीचा रस्ता धरणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा वेगावली आहे. खासदार संभाजीराजेंना २००९ ला राष्ट्रवादीने कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी दिली. पराभवानंतर ते पक्षापासून दुरावले. त्याचाच फायदा घेत भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी देत केवळ महाराष्ट्रात पक्षाला बहुजन चेहरा देण्याचा प्रयत्न केला. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद, त्याला सहाशे कोटींचा निधी देत छत्रपती घराण्याचा सन्मान आम्ही केल्याचा प्रचारच सुरू झाला. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने केला; पण संभाजीराजेंनी पहिल्यापासून या पक्षाच्या एकूण सर्व प्रक्रियेपासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न केला. ‘भाजपचे खासदार’ असा शिक्का नावापुढे लागू नये याची त्यांनी पूरेपूर काळजी घेतली. त्यांचे पिता छत्रपती शाहू महाराज, बंधू मालोजीराजे हे काँग्रेसला मानणारे आहेत. त्यामुळे घरातच दोन पक्ष दिसत असले तरी पाच वर्षांत भाजपचा फायदा होईल अशी कोणतीच भूमिका संभाजीराजेंनी घेतली नाही. यामुळे त्यांच्यावर पक्षात नाराजी होती, फक्त ती स्पष्टपणे बोलून दाखविण्यात आली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर हा विषय घेऊन राज्यभर वातावरण तापवण्याचा भाजपचा डाव आहे. यामध्ये संभाजीराजेंनी पुढाकार घेतल्यानंतर ते आक्रमक होतील आणि त्याचा राजकीय फायदा आपल्याला होईल असे भाजपला वाटत होते. पण आक्रमक झालेल्या संभाजीराजेंनी अचानक आंदोलनाचे अनेक टप्पे पाडल्याने त्यातील हवा गेली. यामुळे भाजपचे नेते नाराज झाले. यातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच संभाजीराजेंच्या आंदोलनाविषयी संशय व्यक्त केला. सरकारला वेळ देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोप केला. याची दखल न घेण्याची भूमिका घेत संभाजीराजेंनी प्रदेशाध्यक्षांनाच बेदखल केले. ज्यांनी खासदार करण्यात पुढाकार घेतला, त्यांनाच बेदखल केल्याने पक्षात हलकल्लोळ उडाला आहे.

- Advertisement -

भाजपने खासदार करूनही या पक्षाचा शिक्का आपल्यावर पडू नये म्हणून काळजी घेणारे संभाजीराजे या पक्षावर नाराज आहेत. ते आपली नाराजी विविध कृतीतून व्यक्त करत आहेत. चार पत्रे पाठवूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला नाही. यामुळे ते नाराज झाले. ती नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यापूर्वी चाळीस वेळा भेट दिली, सन्मान दिला त्याचे काय, असा सवाल प्रदेशाध्यक्षांनी केला. त्यानंतर भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी संभाजीराजेंवर तोफ डागली. त्यांच्या या धाडसाला कुणाचा पाठिंबा होता, याची चर्चा पक्षात सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही महिने संभाजीराजे भाजपवर नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या खासदारपदाची मुदत पुढील वर्षी संपत आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांना भाजप पुन्हा कुठे संधी देईल याची शक्यता दिसत नाही. यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

संभाजीराजे पेपरवर भाजपचे खासदार

इस्लामपूर : संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. ‘संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचे नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे पाटील म्हणाले. ते शनिवारी इस्लामपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनाविषयीच्या भूमिकेवर बोट ठेवले. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करतात. मात्र, लोकप्रतिनिधींना जाब विचारुन हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात. या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -